Shimoga College 
देश

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात भगवा झेंडा फडकावला? : ही आहे वस्तुस्थिती

कर्नाटकात हिजाबच्या वादावरून कायदेशीर लढाई सुरू आहे..

सरकारनामा ब्युुरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बुरख्याचा वाद पेटला आहे. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळा (School) आणि महाविद्यालयांमध्ये (Colleges) वादाचे प्रसंग घडत असून तणावाचे वातावरण आहे. आता हिजाब बंदीचा हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. शिमोगा येथे महाविद्यालयात राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज फडकावण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात तसे घडले नसल्याचे समोर आले आहे.

याबाबत विविध वाहिन्यांशी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय बी. आर. यांनी वस्तुस्तिती सांगितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या घटनेच्या वेळी ते तेथेच उपस्थित होते. हे विद्यार्थी जेव्हा खांबावर चढले तेव्हा खांबावर कोणताही झेंडा नव्हता. हा पोल रिकामा होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तिरंगा काढला, असे म्हणणे असत्य आहे. या विद्यार्थ्यांनी भगवा झेंडा फडकावला होता, हे खरे आहे आणि ही कृती करण्यास आमचे समर्थन नाही. या विद्यार्थ्यांनी तिरंग्याला हात लावणार असते तर आम्ही त्यांना नक्कीच रोखले असते, असेही प्राचार्य़ांनी स्पष्ट केले.

याबाबत Fact Crescendo ने याची खातरजमा करून त्याची स्वतंत्र स्टोरी केली आहे.

बुरखा बंदीच्या निर्णयावरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी राज्यातील शाळा व महाविद्यालये पुढील तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बोम्मई यांनी याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा (Hijab) घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापन तसेच कर्नाटकमधील नागरिकांनीही राज्यात शांतता राखावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचेही बोम्मई यांनी सांगितले. दरम्यान, काही महाविद्यालयांमध्ये मंगळवारी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, उडपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थींनींचा एक गट आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गट समोरासमोर आले. त्यावेळी उपरणं घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये घोषणाबाजी करत निदर्शने केली. यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेलं आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT