Sonam Wangchuk | Abhijeet Dipke | NEET Paper Leak Sarkarnama
देश

Abhijeet Dipke : सोनम वांगचुक यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, "सर, स्वतःच्या जीवाची बाजी लावून..."

Sonam Wangchuk hunger strike : "मी 26 दिवसांनंतर माझे उपोषण सोडले. यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील 65 खासदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन किंवा पत्रांद्वारे मला उपोषण सोडण्याची विनंती केली होती. 'विविध अटींवर दीर्घ चर्चेनंतर आणि देशात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला."

Jagdish Patil

Sonam Wangchuk Hunger Strike Ends : नीट पेपरफुटी प्रकरणी उपोषण सुरू केलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांनंतर अखेर गुरूवारी मध्यरात्री आपलं उपोषण मागे घेतलं. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपलं उपोषण सोडण्यांचा निर्णय घेतला.

याबाबतची माहिती वांगचुक यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करत दिली. या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की, "मी 26 दिवसांनंतर माझे उपोषण सोडले. यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील 65 खासदारांनी प्रत्यक्ष भेट देऊन किंवा पत्रांद्वारे मला उपोषण सोडण्याची विनंती केली होती. 'विविध अटींवर दीर्घ चर्चेनंतर आणि देशात हिंसाचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या अटींबाबत सविस्तर माहिती मी लवकरच एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे देणार आहे."

तर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं तरीही कॉकरोच जनता पार्टी आपल्या आंदोलनावर ठाम आहे. अभिजीत दीपके यांनी वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, "26 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे.

आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. सोनम सर, आपल्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण संपूर्ण देशाच्या विवेकाला जागृत केले. आपले जीवन या देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे.", असं दिपके यांनी म्हटलं.

मात्र, याचवेळी त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देईपर्यंत सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करत NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं.

नीट प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या मसुद्यावर शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर संसदेच्या दुसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होताच हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं मोदींनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

SCROLL FOR NEXT