रामपूर (उत्तर प्रदेश) : समाजवादी पार्टीचे आमदार, माजी मंत्री आझम खान यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आझम खान यांना झालेली शिक्षा हा त्यांच्यासाठीच नव्हे, तर समाजवादी पक्षासाठीही मोठा धक्का मानला जात आहे. अखिलेश यादव यांच्यानंतर खान सपातील मोठे नेते मानले जातात.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास एमपीएमएलएच्या विशेष न्यायालयाने सुनावणी सुरू केल्यानंतर खान यांना दोषी ठरवताच, त्यांना ताब्यात घेण्यात आले. चारच्या सुमारास न्यायालयाने निकाल दिला. यादरम्यान आझम खान यांची रवानगी आता कोठडीत करण्यात आली.
आझम खान यांच्या विरुद्ध एकूण तीन कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या तिन्ही प्रकरणात ते दोषी आढळले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आझम खान यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी आणि मुख्यंमंत्री योगी यांच्यावरही आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे.
आझम खान यांची याचिका फेटाळली :
यापूर्वीच आझम खान यांच्याकडून निकालाची तारीख पुढे ढकलण्यात यावा, यासाठी अर्ज दाखल करण्यात आला दिला होता. संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे खान यांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे निकालाची तारीख ढकलण्यात यावी, असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला.
निवडणुकीदरम्यान आझम खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत :
प्रक्षोभक भाषणाचे हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानची आहे. आझम खान हे लोकसभा निवडणूक लढवत होते. त्यादरम्यान सपा आणि बसपाची युती झाली. आझम खान यांनी ती निवडणूक जिंकली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातच मिलक कोतवाली या ठिकाणी एक घटना घडली.
यामध्ये खान यांनी घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांचा आणि तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. धमकावून दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला. विशिष्ट वर्गाला धर्माच्या नावावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या आरोपांसह, व्हिडिओ निरीक्षण पथकाचे प्रभारी अनिल कुमार चौहान यांच्या वतीने आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
लोकप्रतिनिधींना शिक्षेची तरतूद :
लोकप्रतिनिधींसाठी बनवलेल्या कायद्यानुसार आमदाराला दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व जाते. आझम खान यांच्यासाठी ही मोठी समस्या आहे. यापूर्वी अयोध्येच्या गोसाईगंज विधानसभेतील भाजपचे आमदार खब्बू तिवारी यांना आमदारकी गमवावी लागली होती. त्यांना न्यायालयाने दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा सुनावली होती. आझम खान 2019 च्या निवडणुकीत रामपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. या वर्षीच त्यांनी रामपूरमधून आमदार झाल्यानंतर आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.
शिक्षा लोकप्रतिनिधींसाठी उदाहरण बनेल :
भाजप नेते आकाश सक्सेना म्हणाले की, आझम खानची शिक्षा देशात एक आदर्श निर्माण करेल. आता लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या काळात प्रक्षोभक भाषणे देणे टाळतील आणि त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात मोठी सुधारणा होईल. आझम खान यांच्याविरोधात द्वेषपूर्ण भाषणाची तक्रार आकाश सक्सेना यांनीच निवडणूक आयोगाकडे केली होती. या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आकाश सक्सेना हे रामपूरमधून आझम खान यांच्याविरोधात भाजपच्या तिकिटावर लढले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.