Shimla News: आईसोबत राहण्यासाठी एका चिमुरडीने मुख्यमंत्र्यांकडे केलेली आर्त विनवणी अवघ्या २४ तासांत पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळत पाचवीत शिकणाऱ्या वंशिकाच्या आईची सुमारे ७०० किलोमीटर दूर असलेल्या शिमला जिल्ह्यातून चंबा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. आई घराजवळ येणार असल्याने वंशिकासह संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
चंबा जिल्ह्यातील देहग्रां येथे बुधवारी ‘सरकार गाव के द्वार’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तीसा येथील शासकीय प्राथमिक शाळा सत्यासमध्ये पाचवीत शिकणारी वंशिका ही हिमाचल प्रदेशातील मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना भेटली.
त्यांच्यासमोर जाताच ती भावूक झाली आणि त्यांना मिठी मारून रडू लागली. गेल्या दोन वर्षांपासून आईपासून दूर राहावे लागत असल्याची वेदना तिने अश्रूंमधून व्यक्त केली. आईची नियुक्ती घराजवळ करावी, जेणेकरून तिला आईसोबत राहता येईल, अशी तिची विनंती होती.
वंशिकाची आई नरो देवी या शिमला जिल्ह्यातील नेरवा शिक्षण विभागांतर्गत सोवल येथील शासकीय प्राथमिक शाळेत जेबीटी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. चंबा जिल्ह्यातील तीसा येथील चंडरू शासकीय प्राथमिक शाळेत त्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी वंशिकाला तिच्या आईला घराजवळ नियुक्ती देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे गुरुवारी, शालेय शिक्षण संचालनालयाने बदलीचे आदेश जारी केले. पाच टक्के बदली धोरणांतर्गत ही आंतरजिल्हा बदली करण्यात आली. बदलीवरील निर्बंधांमध्ये विशेष सवलत देऊन हा निर्णय घेतल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे संचालक आशीष कोहली यांनी दिली.
वंशिकाचे वडील गिरीश कुमार हे शेतकरी आहेत. वंशिका आणि तिचा भाऊ वडिलांसोबत गावात राहत होते. आई नोकरीनिमित्त दूर असल्याने मुलांना तिच्यापासून लांब राहावे लागत होते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत वंशिकाने शिक्षणाबाबतची स्वप्नेही सांगितली होती. तिला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचा असून, भविष्यात आयपीएस अधिकारी होण्याची तिची इच्छा आहे.
आईची बदली जवळ झाल्याची बातमी समजताच वंशिकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. “मुख्यमंत्री अंकल यांनी दिलेला शब्द पाळला. आता आई माझ्याजवळ आली आहे. मला आता एकटं राहावं लागणार नाही,” अशा भावना तिने व्यक्त केल्या. आईच्या सोबत राहून नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी आणि पुढील शिक्षणासाठी तयारी करता येईल, असेही तिने सांगितले.
नरो देवी यांनीही मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुलीची अडचण समजून घेत अल्पावधीत निर्णय घेतल्याने मुलांच्या शिक्षणाकडे आणि संगोपनाकडे अधिक लक्ष देता येईल, असे त्यांनी म्हटले. एका विद्यार्थिनीच्या भावनिक विनंतीची प्रशासनाने तत्परतेने दखल घेतल्याने या निर्णयाची चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.