Charanjit Singh Channi Sarkarnama
देश

दोन आमदारांच्या जोरावर चन्नी मुख्यमंत्री! 42 जणांचा पाठिंबा असलेल्या नेत्याला ठेंगा

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील (Congress) नेत्यांचे हेवेदावे अद्याप थांबलेले दिसत नाही. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. निवडणुकीदरम्यान पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून तयारी केली जात असतानाच जाखड यांनी आपल्यालाच सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा होता, असा दावा करत या शर्यतीत आपणही दावेदार असल्याचे संकेत दिले आहेत. (Punjab election 2022)

माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक खलबतं झाली. अखेर चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांच्यासह जाखड हे दोघेही नाराज झाल्याची जोरदार चर्चा होती. आता जाखड यांच्या वक्तव्यामुळे ही नाराजी उघडपणे समोर आली आहे.

एका सभेत बोलताना जाखड म्हणाले, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी 79 आमदारांना मुख्यमंत्रिपदासाठी मतदान करण्यास सांगितले होते. त्यामध्ये 42 आमदार माझ्या बाजूने होते. तर रंधावा यांना 16, प्रणित कौर यांना 12, सिध्दूंना सहा आमदारांचा पाठिंबा होता. तर चन्नी यांना केवळ दोन मतं मिळाली. एवढ्या आमदारांचा पाठिंबा असूनही मुख्यमंत्री झालो नाही. पण 42 जण माझ्या पाठिशी होते, याचा आनंद आहे. इतकं समर्थन असूनही मला केवळ उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली, याने मी नाराज झालो होतो, असं जाखड म्हणाले आहेत.

जाखड यांच्या या दाव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. जाखड हे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. चन्नी यांची निवड करताना काँग्रेस दलित नेता म्हणून त्यांना प्राधान्य दिल्याचे बोलले जाते. मात्र, याचवेळी जाट आणि शीख समुदायाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही काँग्रेसवर झाला. हिंदू आणि शिखांमध्ये फूट पाडण्याची मोठी किंमत काँग्रेसला मोजावी लागू शकते, असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी काँग्रेसकडून सर्वेक्षण केले जात आहे. हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून लवकरच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडून त्याची घोषणा केली जाऊ शकते. त्यांनीच प्रचार सभेदरम्यान याबाबत कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगितले होते. या स्पर्धेत चन्नी आणि सिध्दू यांची नावे पुढे असल्याचे समजते. पण काँग्रेसकडून चन्नी यांना पसंती दिली जाऊ शकते. सिध्दू यांच्यावर विरोधकांकडून होत असलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांचे नाव मागे पडले आहे, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT