dushyant chautala | narendra modi.png sarkarnama
देश

Assembly Election 2024 : "...अन् तेव्हा भाजपसोबत राहिलो, ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक," माजी उपमुख्यमंत्र्यांचं विधान

Haryana Assembly Election 2024 : हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री म्हणतात, "शेतकरी आंदोलनात सर्वात मोठा खलनायक मला ठरविण्यात आलं. आमच्या पक्षाचा एकही सदस्य लोकसभेत आवाज उठविण्यासाठी नव्हता."

Akshay Sabale

2021 मध्ये कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत हरियाणा, उत्तरप्रदेश आणि देशातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. तब्बल 378 दिवस हे आंदोलन सुरू होते. अखेर मोदी सरकारनं नमते घेत तीनही कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं. यातच हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पक्षाचे ( जेजेपी ) नेत, दुष्यंत चौटाला यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

"शेतकरी आंदोलनाच्या काळात भाजपसोबत राहणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती," असं चौटाला यांनी म्हटलं आहे. हरिणायात विधानसभा निवडणुकीच्या ( Assembly Election 2024 ) दृष्टीनं राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच भाजपसोबत सत्तेत बसलेल्या चौटाला यांनी बाहेर पडल्यानंतर केलेल्या या विधानानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

चौटाला यांनी म्हटलं, "राजकारणात अनेक विचारधारा एकत्र येतात. त्यात अनेकवेळा बदल देखील होतो. आम्ही हरियाणात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही परिवर्तनासाठी काम केलं. आम्ही बोललो होतो, जेव्हा किमान आधारभूत किंमतीचा ( एमएसपी ) प्रश्न येईल तेव्हा सरकारमधून बाहेर पडू. 'एमएसपी'साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांना पत्र लिहिलं होतं."

"आम्ही भाजपसोबत ( Bjp ) सरकार चालवलं. विकासकामे केली. मात्र, निवडणुकीत काही गोष्टींवर सहमती झाली नाही, तेव्हा भाजप आणि आमचे रस्ते वेगळे झाले. शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू होते. त्यावेळी भाजपसोबत राहण्याची भूमिका घेणं, ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. ती चूक आज स्वीकारत आहे. हरियाणातील जनता या निवडणुकीत साथ देईल," असा विश्वास चौटाला यांनी व्यक्त केला.

"शेतकरी आंदोलनात सर्वात मोठा खलनायक मला ठरविण्यात आलं. आमच्या पक्षाचा एकही सदस्य लोकसभेत आवाज उठविण्यासाठी नव्हता. आज नायब सिंह सैनी मुख्यमंत्री आहेत. पण, तेव्हा भाजपसोबत सरकार स्थापन केलं नसतं, तर हरियाणाच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नसती," असं चौटाला यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT