Navjot Singh Sidhu  Sarkarnama
देश

काँग्रेसचा नेता हत्तीवर बसून फिरत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला अन्...

नवज्योतसिंग सिद्धू यांना पातियाळा कारागृहात ठेवणार

सरकारनामा ब्युरो

चंडीगड : पंजाबमधील (Punjab) पराभवानंतर काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. आता त्यांना न्यायालयानं दणका दिला आहे. तब्बल 34 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयानं सिद्धूंना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे सिद्धू यांना ही शिक्षा भोगण्यासाठी न्यायालयासमोर शरण यावं लागेल. विशेष म्हणजे, हत्तीवर बसून फिरत असतानाच सिद्धूंना शिक्षा झाल्याचं कळालं होतं.

महागाईच्या मुद्द्यावर मोदी सरकारच्या विरोधात आज काँग्रेसनं आंदोलन केल. या आंदोलनाचं नेतृत्व सिद्धूंनी केली. या आंदोलनासाठी सिद्धू हे चक्क हत्तीवर बसून फिरत होते. महागाईत फार मोठी वाढ झाल्याचा संदेश सिद्धूंनी दिली. याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. त्यानंतर सिद्धू हे तातडीनं पातियाळातील त्यांच्या निवासस्थानी पोचले. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी या निकालावर त्यांना प्रतिक्रिया विचारली असता ते नो कमेंट्स असं म्हणून निघून गेले. सिद्धू हे या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत आहेत पण त्यांना तुरूंगात जाण्यापासून वाचण्याचा सध्या कोणताही मार्ग शिल्लक नाही. सिद्धूंना आजच शरण यावे लागेल अन्यथा त्यांना पोलीस अटक करतील. त्यानंतर त्यांची रवानगी पातियाळा कारागृहात होईल.

सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल दिला आहे. सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पातियाळातील रहिवासी गुरनामसिंग यांच्याशी 1988 मध्ये भांडण झालं होत. पार्किंगच्या जागेवरून हा वाद झाला होता. सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपिंदरसिंग संधू यांनी गुरनाम यांना कारमधून बाहेर ओढून मारहाण केली होती. यात गुरनामचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सुनावणी तीन दशकांहून अधिक काळ सुरू होती.

पुरावे नसल्याने आणि संशयाचा फायदा देत पातियाळा सत्र न्यायालयानं 1999 मध्ये सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या खटल्यातून मुक्त केलं होतं. याला पंजाब व हरियाना उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणी उच्च न्यायालयानं 2006 सिद्धू यांना दोषी ठरवून त्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. यावर सिद्धूंनी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवला होता. परंतु, ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी सिद्धूंना दोषी ठरवलं होतं. त्यांना तुरूंगवास दिला नव्हता पण 1 हजार रुपयांचा दंड सुनावला होता. मात्र, सिद्धू यांचे सहकारी संधू यांची न्यायालयाने पुरावे नसल्याने मुक्तता केली होती. यावर गुरनामच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका केली होती. या याचिकेला सिद्धूंनी विरोध केला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयानं सिद्धूंना या प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT