Arvind Kejriwal, Supreme Court Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : मोठी बातमी : केजरीवालांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 5 महिन्यांनी येणार जेलबाहेर

Supreme Court Delhi Liquor Scam Case : अरविंद केजरीवाल एक एप्रिलपासून तिहार जेलमध्ये आहेत. ईडीनंतर त्यांनी सीबीआयनेही अटक केली होती.

Rajanand More

New Delhi : कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना नियमित जामीन मंजूर केला. त्यांना फार काळ जेलमध्ये ठेवता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यापासून ते तुरुंगात होते. आता कोर्टाने जामीन दिल्याने जेलमधून बाहेर येण्याचा केजरीवालांचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुर्यकांत आणि उज्वल भूयान यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सुरूवातीला ईडीने आणि नंतर सीबीआयने केजरीवालांना अटक केली होती. सीबीआयने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत केजरीवालांनी त्याविरोधात आणि नियमित जामीनासाठी अशा दोन याचिका दाखले केल्या होत्या.

कोर्टाने शुक्रवारी दोन्ही याचिकांवर निकाल दिला. सीबीआयच्या अटकेबाबत दोन्ही न्यायाधीशांनी वेगळे मत मांडले. न्यायाधीश सुर्यकांत यांनी केजरीवाल यांची अटक कायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तर न्यायाधीश भूयान यांनी सीबीआयने केलेली अटक समर्थनीय नसल्याचे नमूद केले आहे.

सीबीआय गोलमाल उत्तरे देऊन अटक योग्य ठरवू शकत नाही. त्यामुळे ही अटक पुढेही कायम केली जाऊ शकत नाही. आरोपींना जबाब देण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकत नाही, असेही न्यायाधीश भूयान यांनी स्पष्ट केले. केजरीवालांना जामीन मंजूर करताना कोर्टाने म्हटले की, आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्यावर विचार केला आहे. केसमध्ये लवकर ट्रायल पूर्ण होण्याची शक्यता नाही. जामीनाच्या अटक ट्रायल कोर्ट ठरवेल.

केजरीवालांना यापूर्वीच ईडीच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. आता सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मंजूर झाल्याने ते 156 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे. ईडीच्या प्रकरणात जामीन देताना घालण्यात आलेल्या अटी सीबीआयच्या प्रकरणातही कायम राहणार आहेत. त्यामुळे केजरीवाल तुरुंगातून बाहेर येणार असले तरी त्यांना सरकारी कागदपत्रांवर मुख्यमंत्री म्हणून सही करता येणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT