supreme court
supreme court sarkarnama
देश

आम्ही मध्यरात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहत होतो! सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला सुनावलं

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरला आणखी एका भाजप नेत्यासह चौघांना गडाआड केले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला आज फैलावर घेतले.

सर्वोच्च न्यायालयाने लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, हा अहवाल थेट आजच मुदत संपताना सादर करण्यात आला. यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालय म्हणाले की, काल रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहत होतो की आम्हाला अहवाल मिळेल. परंतु, अखेरच्या क्षणी तुम्ही अहवाल हाती दिला आहे. तो आम्ही वाचणार कधी? तुम्ही किमान एक दिवस आधी तरी तो सादर करायला हवा होता.

उत्तर प्रदेश सरकारच्या अहवालाचाही न्यायालयाने चिरफाड केली. न्यायालय म्हणाले की, तुम्ही केवळ 4 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणात 44 साक्षीदार असताना फक्त चौघांचे जबाब नोंदवण्यात आले. आणखी जबाब का नाहीत? किती आरोपी पोलीस कोठडीत आणि किती न्यायालयीन कोठडीत? पोलीस चौकशी करीत नाहीत तोपर्यंत आम्हाला माहिती मिळणार नाही. हे प्रकरण अनुत्तरीत गोष्टीसारखे होऊ नये. पोलिसांना साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सांगा आणि साक्षीदारांची सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे.

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली असून, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आशिष मिश्रासह लव कुश, आशिष पांडे आणि भारती या चौघांना अटक झाली आहे. पोलिसांनी आता स्थानिक भाजप नेता सुमित जयस्वाल याच्यासह शिशुपाल, नंदन सिंह बिष्ट आणि सत्य प्रकाश त्रिपाठी यांना अटक केली आहे. लखीमपूर पोलिस आणि गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत. मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT