CJI Surya Kant Court Room  Sarkarnama
देश

CJI Surya Kant : धक्कादायक : सरन्यायाधीशांसमोर महिला वकिलाचा थयथयाट; कुणालाच जुमानले नाही अन् करायचे ते केलंच...

CJI Surya Kant Supreme Court incident : सुप्रीम कोर्टात CJI सूर्यकांतांसमोर महिला वकिलाने थयथयाट करत गोंधळ घातला. वारंवार इशारे दिल्यानंतरही करायचे ते केलंच.. संपूर्ण घटना जाणून घ्या.

Rashmi Mane

सुप्रीम कोर्टात बुधवारी अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सरन्यायाधीशांच्या न्यायालयात एका महिला वकिलांनी केलेल्या आक्षेपार्ह वर्तनामुळे काही वेळासाठी कारवाई थांबवावी लागली होती. सरन्याय‍ाधीश सूर्य कांत, जस्टिस उज्जल भुइयां आणि जस्टिस एन.के. सिंह यांच्या खंडपीठासमोर प्रकरणांची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली.

सुनावणीदरम्यान संबंधित महिला वकील अचानक जोरात बोलू लागल्या आणि त्या दिवशीच्या यादीत नसलेल्या एका प्रकरणावर चर्चा करू लागल्या. न्यायालयाने वारंवार त्यांना शांत राहण्याचा आणि नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे न्यायालयातील वातावरण तणावपूर्ण बनले.

महिला वकिलांनी सांगितले की त्यांची एक जवळची मैत्रीण दिल्लीतील एका गेस्ट हाऊसमध्ये हत्या करण्यात आली असून त्या प्रकरणात योग्य तपास होत नाही. त्यांनी आरोप केला की ज्या पोलिस अधिकाऱ्याने सुरुवातीला एफआयआर नोंदवण्यास नकार दिला, त्याच अधिकाऱ्याला आता तपासाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी मोठ्या आवाजात मांडली.

मुख्य न्यायाधीशांनी त्यांना समजावले की सर्वोच्च न्यायालयात कोणतेही प्रकरण मांडण्यासाठी ठराविक प्रक्रिया आहे आणि त्यांना योग्य पद्धतीने याचिका दाखल करावी लागेल. यावर महिला वकिलांनी मानसिक तणावात असल्याचे सांगत तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली, मात्र तरीही त्या न्यायालय कक्ष सोडण्यास तयार नव्हत्या. त्यांचे सततचे बोलणे आणि आक्षेपांमुळे पुढील प्रकरणाची सुनावणीही काही काळासाठी अडथळ्यात आली.

परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून न्यायालयाने उपस्थित वरिष्ठ वकिलांना त्यांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगण्याची विनंती केली. तरीही त्या शांत न झाल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोठ्याने विरोध केला आणि त्यांना हात लावू नका, असे सांगत ओरडू लागल्या. गोंधळ वाढत असल्याने काही वेळासाठी कोर्टातील लाइव्ह स्ट्रीमिंगही म्यूट करण्यात आले.

.

शेवटी सुरक्षा पथकाने त्यांना न्यायालय कक्षाबाहेर काढले आणि त्यानंतर सुनावणी पूर्ववत सुरू झाली. या संपूर्ण घटनेमुळे सर्वोच्च न्यायालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले

SCROLL FOR NEXT