Narendra Modi with Nupur Sharma (File Photo)
Narendra Modi with Nupur Sharma (File Photo)  Sarkarnaam
देश

भाजपनं हकालपट्टी केल्यानंतर लगेचच महिला नेत्याला मिळाली पोलिसांची सुरक्षा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : प्रेषित महंमद पैगंबर व मुस्लिम धर्म यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपने (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना निलंबित केले आहे. त्यानंतर शर्मा यांनी आपल्या वक्तव्यावरून माफीही मागितली होती. रागाच्या भरात ते वक्तव्य केल्याचा खुलासा त्यांनी केला होता. आता त्यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर तातडीने शर्मांना पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. (Nupur Sharma Latest Marathi News)

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून मोठा गदारोळ उडाला होता. या प्रकरणी उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होेते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटले होते. अखेर भाजपने शर्मांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शर्मांनी दिल्ली पोलिसांकडे धाव घेतली होती. मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत, अशी तक्रार त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. माझा हेतू कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. माझी व माझ्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची मला काळजी वाटत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यानंतर लगेचच दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवली आहे.

दरम्यान, भाजपने नुपूर शर्मा यांच्याप्रमाणेच नवीन कुमार जिंदाल यांनाही निलंबित केले आहे. त्यांनी ट्विटवर वादग्रस्त पोस्ट केली होती. दोन्ही नेत्यांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या. शर्मा आणि जिंदाल यांच्यामुळे या वादात भर पडली होती. याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गंभीरपणे दखल घेतल्याचे समजते. त्यामुळे पक्षाने दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूणसिंह यांनी याबाबतचे निवेदन जाहीर केले होते.

भारताच्या हजार वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म वाढला आहे. भाजपकडून सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. कोणताही धर्म किंवा धार्मिक व्यक्तींचा अपमान निंदनीय आहे. कोणत्याही धर्माचा अपमान करणाऱ्या विचारधारेविरोधात पक्ष आहे. भाजपकडून अशा कोणत्याही विचारधारेचा प्रचार केला जात नाही, असं निवेदनात स्पष्ट करून नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्या वक्तव्यांपासून पक्षानं हात झटकले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT