West Bengal Assembly Session
West Bengal Assembly Session  Sarkarnama
देश

सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये हाणामारी! विरोधी पक्षनेत्यांसह भाजपचे पाच आमदार निलंबित

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज रणकंदन पहायला मिळाले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे आमदार सभागृहात आमनेसामने आले. आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यासोबत हाणामारी केल्याचा प्रकार घडला. यामुळे अखेर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना निलंबित केले आहे. या प्रकारामुळे तृणमूल विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

वीरभूममधील हिंसाचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्याचे समोर आले असून, या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजप (BJP) आमदारांनी लावून धरली. यामुळे विधानसभेत गोंधळ उडाला. यावर तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदारही आक्रमक झाले. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये हाणामारी सुरू झाली. हा प्रकार रोखण्यासाठी अखेर मार्शल आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. यात तृणमूलचे आमदार असित मुजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी नाकावर ठोसा मारल्याचा दावा आमदार मुजुमदार यांनी केला आहे. यामुळे अधिकारी यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यांचे निलंबन संपूर्ण वर्षभरासाठी असणार आहे. यावर बोलताना तृणमूल काँग्रेेसचे नेते फिरहाद हकीम म्हणाले की, आमचे काही आमदार सभागृहात जखमी झाले आहेत. भाजपच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो.

पश्चिम बंगालच्या (West Bengal) बीरभूम (Birbum) जिल्ह्यातील रामपूरहाट येथे 8 लोकांना जिवंत जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. यावरून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. उच्च न्यायालयाने हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला आहे. वीरभूममधील हिंसाचाराची उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. हा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देऊ नये, ही तृणमूल सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. या हिंसाचार प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

वीरभूममध्ये नेमकं काय घडलं?

रामपूरहाट जवळील बोगटुई गावात जमावाने काही घरांना आग लावली होती. घरांना बाहेरुन कड्या लावून ही आग लावण्यात आली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 5 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. ही घटना 22 मार्चला घडली होती. तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते भादू शेख यांची गावठी बॉम्बने हल्ला करून हत्या झाली होती. याचा सूड उगवण्यासाठी रामपूरहाटमध्ये हिंसाचार करण्यात आल्याचे समोर येत आहे. या हिंसाचारात ठार झालेले सर्व एकाच कुटुंबातील होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT