Supreme Court
Supreme Court Sarkarnama
देश

Talaq-e-Hasan | तलाक-ए-हसन सकृतदर्शनी इतका अनुचित वाटत नाही : सर्वोच्च न्यायालय

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : मुस्लिम धर्मात पत्नीला घटस्फोट देण्याची ‘तलाक-ए-हसन' ही प्रथा प्रथमदर्शनी किंवा सकृतदर्शनी इतकी अनुचित वाट नाही व याचा ‘अजेंडा‘ केला जाऊ नये असे न्यायालयाचे मत आहे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज केली. न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. एस के. कौल यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी सुरू असून २९ ऑगस्टला पुढील सुनावणी होईल.

पत्रकार बेनझील नाझ यांनी, पतीने आपल्याला तलाक-ए-हसन दिला व हुंड्यासाठी छळ करून नंतर तलाक दिला, अशी तक्रार करणारी याचिका दाखल केली आहे. तलाकबाबत न्यायालयाने तटस्थ धर्म, तलाकची एकसमान प्रक्रिया व तटस्थ समान आधाराबाबत एकसारखे दिशानिर्देश तयार करावेत अशीही त्यांनी याचिकेत विनंती केली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने, या पध्दतीत संबंधित महिलेकडेही लग्न टिकवून ठेवण्याचे पर्याय उपलब्ध असतात, असे मत मांडले. सहमतीने विभक्त होण्यास तुम्ही तयार आहात का, याबाबत पुढच्या सुनावणीत सांगा, असेही न्यायालयाने बेनझीर यांना सांगितले. तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही व ही याचिका जनहित याचिका म्हणून का दाखल केली, असाही सवाल न्यायालयाने विचारला.

तीनदा तलाकबंदी प्रकरणात तलाकच्या अन्य पध्दतींबाबतचे काही प्रश्न अनुत्तरित राहिले होते त्यामुळे तलाक-ए-हसन बाबत सुनावणी केली पाहिजे अशी विनंती बेनझीर यांच्या वकील पिंकी आनंद यांनी केला.

या तलाक पध्दतीत महिलांकडेही एक पर्याय निश्चितपणे उपलब्ध असतो. त्यामुळे असा तलाक हा महिला अधिकारांचा सरसकट अवमान ठरतो या मताशी सकृतदर्शनी आपण सहमत नाही असे न्या. कौल यांनी सांगितले. बेनझीर यांचा हुंड्यासाठी सासरी छळ होत होता. त्यांनी हुंडा देण्यास असमर्थता व्यक्त केली तेव्हा पतीने एका वकिलाकरवी त्यांना तलाक-ए-हसन दिला असे याचिकेत म्हटले आहे. १९ एप्रिल व २० मे रोजी दोन नोटीशींच्या द्वारे त्यांना पतीने परस्पर तलाक दिला असेही त्यांनी म्हटले आहे. अशा पध्दतीने एकतर्फी तलाक देणे हा मनमानी व समानतेच्या घटनादत्त अधिकारांचे उल्लंघन करणारा ठरतो व तलाकची ही प्रथा सती प्रथेप्रमाणेच सामाजिक कुप्रथा आहे. इस्लामच्या मौलिक सिध्दांतांमध्ये तलाक-ए-हसन चा समावेशच नाही. त्यामुळे न्यायालयाने ही पध्दतीदेखील बेकायदेशीर म्हणून घोषित करावी असाही युक्तिवाद बेनझीर यांच्यावतीने करण्यात आला आहे.

तलाक-ए-हसन म्हणजे काय ?

तीनदा तलाक म्हणून एका फटक्यात तलाक देण्याची कायदेशीरदृष्ट्या बेकायदा प्रथा इस्लाममध्ये आहे. मात्र तलाक-ए-हसन व तलाक-ए- बिद्दत या अन्य दोन प्रथांबाबत अद्याप देशात कायदेशीर निर्णय आलेला नाही. तलाक-ए-हसन मध्ये पती आपल्या पत्नीला एकदा तलाक म्हणतो. त्यानंतर तो महिनाभर तिच्या उत्तराची वाट पहातो. दुसऱ्या महिन्यात तो पुन्हा तलाक म्हणतो व तिसऱ्या महिन्यात त्याने पत्नीला तिसऱ्यांदा तलाक म्हटल्यावर तो विवाह संपुष्टात येतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT