Assembly Session Sarkarnama
देश

विधानसभा अध्यक्षांचा विरोधकांना पुन्हा दणका; गोंधळ घालणारे चार आमदार निलंबित

विधानसभेच्या अधिवेशनात (Assembly Session) विरोधक सतत आक्रमक होत असल्याने सदस्यांचे निलंबन करावे लागत आहे.

सरकारनामा ब्युरो

अमरावती : विधानसभेच्या अधिवेशनात (Assembly Session) विरोधक सतत आक्रमक होत असल्याने सदस्यांचे निलंबन करावे लागत आहे. विषारी दारूकांड प्रकरणी तेलगू देसम पक्षाच्या (TDP) सदस्यांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी होत आहे. त्यावरून सभागृहात मंगळवारीही गदारोळ झाल्याने चार आमदारांना निलंबित करण्यात आले. मागील आठवड्यातही ११ आमदारांना याच मुद्यावर निलंबित केले होते.

आंध्र प्रदेशमध्ये सध्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेस (YSR Congress) विरुद्ध टीडीपी असा राजकीय संघर्ष सुरू आहे. विषारू दारूकांड प्रकरणावरून हा संघर्ष विधानसभेत पोहचला आहे. या प्रकरणावरून टीडीपीच्या आमदारांकडून सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. सततच्या गदारोळामुळे मागील आठवड्यात दोन वेळा सदस्यांचे निलंबन करण्यात आले. गदारोळ घालणाऱ्या टीडीपीच्या 5 आमदारांना सुरूवातीला आणि नंतर दोन दिवसांनी टीडीपीच्या 11 आमदारांचे एका दिवसासाठी निलंबन करण्यात आले.

मंगळवारीही गदारोळ सुरूच राहिला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांनी टीडीपीच्या चार आमदारांना संपूर्ण अधिवेशन कालावधीसाठी निलंबित केले. या आमदारांमध्ये अशोक बेंदालम, रामकृष्ण बाबू, रामराजू, आणि अनागनी सत्यप्रसाद यांचा समावेश आहे. त्यानंतही टीडीपच्या आमदारांनी गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

आंध्र प्रदेशच्या (Andra Pradesh) विधिमंडळात मागील आठवड्यात चर्चा सुरू असताना टीडीपीच्या सदस्यांनी कामकाजात गोंधळ घातला होता. त्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चा रोखून धरली होती. जगनारेड्डीगुडेम येथे विषारी ताडी पिऊन झालेल्या मृत्यूंची चर्चा करण्याचा मागणी त्यांनी लावून धरली होती. यावर आरोग्यमंत्री अल्ला काली कृष्णा श्रीनिवास यांनी निवेदन देण्याची तयारी दर्शवली होती. यावरही टीडीपीच्या आमदारांनी गोंधळ कायम ठेवला होता. त्यांनी अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांच्यासमोर धाव घेतली होती. त्यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्रे फाड़ून सभागृहात भिरकावली होती.

यानंतर सभागृहातील परिस्थिती गंभीर बनली होती. अखेर विधानसभा अध्यक्षांनी टीडीपीच्या पाच आमदारांना निलंबित केले होते. या आमदारांचे निलंबन अर्थसंकल्पी अधिवेशन संपेपर्यंत कायम राहणार आहे. आता त्यात आणखी चार आमदारांची भर पडली आहे. त्यांना अधिवेशन संपेपर्यंत विधिमंडळात प्रवेश करता येणार नाही. मागील आठवड्यात निलंबनानंतरही टीडीपीच्या आमदारांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिला होता. घोषणाबाजी सुरूच ठेवत ते विधानसभा अध्यक्षांच्या पोडिमयवरही चढले होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलना पाचारण केले होते. मार्शनली या आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT