Telangana Congress 
देश

Telangana Congress: मंत्र्यांकडून आपल्याच पक्षाच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीचा वाद चिघळला

Telangana Congress Row: तेलंगणातील जुक्कलचे आमदार टी. लक्ष्मीकांत राव यांनी तेलंगणाचे आरोग्यमंत्री सी. दामोदर राजनरसिंह यांच्यावर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये आपल्याला शिवीगाळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

Amit Ujagare

Telangana Congress Row: तेलंगणा काँग्रेसमध्ये एक नवा वाद उफाळून आला आहे. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या तीव्र वादानंतर राज्याचे आरोग्यमंत्री सी. दामोदर राजनरसिंह यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप एका आमदाराने केला आहे. 'इंडिया टुडे'नं याबाबत वृत्त दिलं आहे.

जुक्कलचे आमदार टी. लक्ष्मीकांत राव यांनी आरोप केला की, 'हॉटेल शांग्री-ला'च्या लॉबीमध्ये झालेल्या वादावेळी राजनरसिंह यांनी आपल्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अपमानास्पद भाषा वापरली तसंच आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हा वाद 'संगारेड्डी जिल्हा काँग्रेस कमिटी' (DCC) अध्यक्षपदी चंद्र शेखर रेड्डी यांच्या नियुक्तीमध्ये आपली कथित भूमिका असल्याच्या कारणावरून सुरू झाल्याचंही राव यांनी म्हटलं आहे.

लक्ष्मीकांत राव यांनी या नियुक्तीवर आपला कोणताही प्रभाव नसल्याचं स्पष्ट करताना मंत्र्यांच्या मनात आपल्याबद्दल राग का आहे? असा प्रश्न उपस्थित केला. राव यांनी असाही आरोप केला की, याआधी मंत्री राजनरसिंह यांनी आपल्या निवासस्थानी बोलावून, आपले बंधू रामचंदर यांना कथित बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या कामात मदत करण्यास सांगितलं होतं. आपण हे करण्यास नकार दिला होता, त्यामुळंच कदाचित राजनरसिंह आपल्यावर नाराज असावेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

हॉटेलमधील घटनेचा तपशील देताना आमदारांनी सांगितलं की, राजनरसिंह यांनी आपल्याला अर्ध्या तासासाठी एका खोलीत कोंडून ठेवण्याची आणि मारहाण करण्याची धमकी दिली. त्यांनी असाही दावा केला की, मंत्र्यांनी त्यांच्याबद्दल आणि काँग्रेस पक्षाबद्दल सातत्याने शिवीगाळ केली आणि अपमानास्पद टिप्पणीही केली. यावेळी आपण शांत राहणं पसंत केलं आणि मंत्र्यांच्या बोलण्याला कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही.

या वादाच्या वेळी इब्राहिमपट्टनमचे आमदार मलरेड्डी रंगारेड्डी, नलगोंडा येथील एक काँग्रेस नेते आणि एक स्थानिक पत्रकार तिथे उपस्थित होते, जे या घटनेचे साक्षीदार ठरू शकतात, असंही यावेळी आमदार राव यांनी सांगितलं. पण या आरोपांवर अद्याप मंत्री राजनरसिंह यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT