Terror Plot Exposed: Jantar Mantar Attack Plan, Chief Minister Was Target Sarkarnama
देश

Breaking news : दहशतवाद्यांचा खतरनाक प्लॅन उघड; जंतरमंतरवर घातपात, थेट मुख्यमंत्री होते टार्गेट

Jantar Mantar attack conspiracy : जंतरमंतरवर घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उघड केला. तपासात मुख्यमंत्री हेही लक्ष्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. वाचा संपूर्ण बातमी.

Rashmi Mane

Terrorists planned attack at Jantar Mantar : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यबलाने (एसटीएफ) उघड केलेल्या तपासातून दहशतवादी कारवायांचा एक गंभीर कट समोर आला आहे. 'जैशे महंमद'शी संबंधित असल्याचा संशय असलेला महंमद हमिम मोंडल याने दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मोठा घातपात घडवून आणण्याचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणात त्याची मैत्रीण अर्पिता सरकार हिलाही अटक करण्यात आली असून, दोघांकडून अनेक धक्कादायक माहिती मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तपासानुसार, हमिम हा पाकिस्तानातील दहशतवादी हस्तकांच्या थेट संपर्कात होता. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे गणवेश मिळवून काही जणांना आंदोलनस्थळी पाठवण्याची आणि तेथे हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली होती. हमिम प्रत्यक्ष जंतरमंतरवर गेला होता की नाही, याची खात्री अद्याप झालेली नसली तरी या संपूर्ण कटाचा तपास वेगाने सुरू आहे.

हमिमकडून मेक्सिको आणि ब्रिटनमधील सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. या सीमकार्डच्या माध्यमातून तो देशातील विविध भागांतील स्लीपर सेलशी संपर्क साधत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्याच्या मोबाइलमधील माहिती आणि पाकिस्तानातील संपर्कांशी झालेले संभाषण तपासले जात असून परदेशातून आर्थिक मदत कशा मार्गाने मिळत होती, याचाही शोध घेतला जात आहे.

अर्पिता सरकार ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून ती गेल्या 4 वर्षांपासून हमिमच्या संपर्कात होती. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये प्रत्यक्ष भेटी सुरू झाल्या आणि त्यांचे प्रेमसंबंधही निर्माण झाले. तपासात असेही समोर आले आहे की, पश्चिम बंगालमधील प्रभावशाली राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हमिम अर्पिताचा वापर करत होता.

याच माध्यमातून काही राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका राज्यमंत्र्यांच्या मुलाचे अपहरण करून खंडणी उकळण्याचाही कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे हा डाव उधळला गेला.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दोघांनी काही महत्त्वाच्या नेत्यांविषयी वैयक्तिक माहिती गोळा केली होती. अर्पिता प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढवून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती, अशी बाबही चौकशीत समोर आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानातील शाहजाद भट्टी टोळीशी संबंधित काही व्यक्तींची नावेही हमिमच्या चौकशीत समोर आली आहेत. गेल्या 4 महिन्यांपासून तो या नेटवर्कच्या संपर्कात होता. देशातील तरुणांची भरती करणे, पश्चिम बंगालमध्ये दहशतवादी मॉड्यूल मजबूत करणे आणि महत्त्वाच्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे, अशी जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासह काही वरिष्ठ राजकीय नेते आणि पोलिस अधिकारी हमिमच्या रडारवर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या दैनंदिन हालचाली, प्रवासाचे मार्ग आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती गोळा केली जात होती. पाकिस्तानातील हस्तकांकडून त्यांना लक्ष्य करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या का, याचाही सध्या सखोल तपास सुरू आहे.

SCROLL FOR NEXT