Karnataka Congress News
Karnataka Congress News Sarkarnama
देश

Karnataka Government : मोठी बातमी! कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदीचा तिढा सुटला...; शपथविधी सोहळ्याची तारीखही ठरली

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Government News : विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे हिरो असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. कर्नाटकमधील दणदणीत विजयानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु होते. मात्र, अखेर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या (Siddaramaiah) तर उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांच्या नावावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ चर्चेनंतर कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी एकमत झालं. नवनिर्वाचित सरकारचा शपथविधीसोहळा शनिवारी (दि.20) बंगळुरू येथे होणार असल्याची माहिती एएनआयनं दिलं आहे.

मुख्यमंत्रीपदाचा तिढा निर्माण झाल्यानंतर दिल्लीत भेटीगाठींना उधाण आलं आहे. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी बुधवारी (दि.17 ) दिल्लीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती.

त्यानंतर बुधवारी रात्री शिवकुमार(DK Shivakumar) यांनी रणदीप सुरजेवाला यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. सिद्धरामय्या यांनीही रात्री वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी आणि सुरजेवाला यांच्याशी चर्चा केली.

मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या यांच्या नावावर करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज सायंकाळी 7 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच वर्षांनी डी के शिवकुमार मुख्यमंत्री होतील असा फॉर्म्युला काँग्रेसनं ठरवल्याचं समोर येत आहे.

आजचा दिवस महत्त्वाचा...

डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री, कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि दोन मंत्रालये दिली जातील, असे सांगितले जात होते. हायकमांडला सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. शिवकुमारही मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यानंतर काँग्रेसनं डीकेंसमोर तीन सूत्र ठेवली होती. मात्र, ते कशावरही राजी नसल्याचं समोर येत आहे.शिवकुमार यांनी आता त्यांच्या समर्थकांना दिल्लीला बोलावून घेतलं आहे. बंगळुरूला फोन करून समर्थकांना गुरुवारच्या पहिल्या विमानाने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT