Indian Student
Indian Student Sarkarnama
देश

Ukraine-Russia War : परिस्थिती चिंताजनक मात्र भारतीयांच्या मुक्ततेसाठी अजूनही मार्ग खुला

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवरील (Ukraine-Russia War) हल्ले वाढवत नेण्याचा मनोदय अखेर तडीस नेल्याने युक्रेनमध्ये भयावह परिस्थितीत राहणाऱ्या नागरिकांत हजारो भारतीय विद्यार्थ्यांचाही (Indian Students) समावेश असल्याने भारताची चिंता वाढली आहे. राजधानी कीव व अन्य युक्रेनच्या शहरांत किमान २० हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यास आज (ता.24 फेब्रुवारी) सकाळी निघालेल्या एअर इंडियाच्या (Air India) विमानाला, रशियाने (Russia) हल्ला केल्याचे समजताच इराणच्या हवाई हद्दीतूनच यू टर्न घेणे भाग पडले. दुसरीकडे ताज्या संघर्षात बचावात्मक परिस्थितीत युक्रेनने भारताकडून, विशेषतः पंतप्रदान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून मदतीची व हस्तक्षेपाची याचना केली आहे.

युक्रेनमधील भारतीय विद्याथ्यांना माघारी आणण्यासाठी सहाय्य करण्यास भारतीय हवाई दलाने तयारी दाखविली आहे. कीव व इतर शहरांत अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी हवाई दल सज्ज असून सरकारच्या निर्देशांची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे हवाई दलातर्फे सायंकाळी सांगण्यात आले. मात्र आपल्या पाल्यांच्या जिवाच्या भितीने गाबरलेल्या भारतीय नागरिकांनी विदेश व्यवहार मंत्रालयाकडे दूरध्वनी, मेलचा वर्षाव सुरू केला आहे. अनेक जण मंत्रालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याच्या धडपडीत आहेत.

दरम्यान, कीवमधील भारतीय दूतावासाने सायंकाळच्या सुमारास चौथ्यांदा दिशानिर्देश जारी करून भारतीयांना आपापल्या घरांत व सुरक्षित जागेवरच थांबण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, युक्रेनमधून येणारा वृत्तांत, रशियाचे हल्ले वाढत चालल्याने नागरिकांत प्रचंड घबराट पसरली असून लाखो नागरिकांनी भूमिगत रस्ते व बंकर्सकडे धाव घेण्यास सुरवात केल्याचे व त्यामुळे तेथे अफरातफरी उडाल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने तेथील नागरिकांना मन शांत ठेवण्याचे व वर्तमान संकटाला धाडसाने तोंड देण्याचे आवाहन पुन्हा केले आहे.

भारतीय दूतावास नागरिकांना कोणत्याही प्रकारे मदत करण्यास सदैव सज्ज असून संकटात सापडताच भारतीयांनी तेथील दूतावासाच्या मदत कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे कीवमधील भारतीय राजदूत पार्थ सत्पती यांनी म्हटले आहे. तेथील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण व चिंताजनक असली तरी भारतीय दूतावास अद्याप कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

युक्रेनमधील एअरस्पेस बंद झाल्याने एअर इंडियाचे विमान माघारी परतले. मात्र, हवाई दलातर्फे भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याबचा मार्ग अजूनही खुला असल्याचे सांगितले जाते. पर्यायी उपाययोजनेसाठी केंद्र सरकार सातत्याने विचारविनिमय करत आहे. भारतीय दूतावासाने आज जारी केलेल्या तिसऱ्या दिशानिर्देशांत म्हटले आहे की, युक्रेनमधील सध्याची परिस्थिती अत्यंत अनिश्चित आहे. (भारतीय) नागरिकांनी कृपया शांतता राखावी. तुम्ही जेथेअसाल, हॉटेल, घरे, रेल्वे स्थानके, विमानतळ किंवा प्रवासात असाल तेथेच किंवा त्या ठिकाणीच थांबावे. बाहेर पडू नये.

भारताकडून मदतीची याचना...

रशिया-यूक्रेन संघर्ष टोकाला पोहोचल्यावरही भारताने 'दोन्ही बाजूंनी शाती कायम ठेवावी' ही भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान युक्रेनने भारताकडे या संकटातून मार्ग काढण्यासाठी मदतीची जाहीर याचना केली असून पंतप्रधान मोदी व रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्यातील मैत्रीचा संदर्भ युक्रेनच्या ताज्या आवाहनास आहे. भारतातील यूक्रेनचे राजदूत डॉ इगोर पोलिखा यांनीया संकटात भारताने हस्तक्षेप करावा, अशी जाहीर विनंती केली.

ते म्हणाले की, माझ्या मते या संघर्षाच्या काळात भारताचे पंतप्रधान पुतीन यांच्याशी आणि आमच्या (युक्रेनच्या) राष्ट्रपतींशीही चर्चा करू शकतात. भारताने इतिहासात अनेकदा जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. हे युध्द व संभाव्य भीषण रक्तपात टाळण्यासाठी आम्ही भारताकडून एक मजबूत आवाज येईल व युध्द थांबावे यासाठी भारतीय नेतृत्वाच्या सक्रिय पाठिंब्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत, असेही डॉ पोलिखा यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT