Will TMC face a major split in West Bengal Sarkarnama
देश

TMC Crisis News: शिवसेना-राष्ट्रवादीनंतर आणखी एक पक्ष फुटणार? 50 आमदार बंडखोरीच्या पावित्र्यात

Will TMC face a major split in West Bengal: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा. 50 ते 60 आमदार बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे ममता बॅनर्जींसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.

Mangesh Mahale

Maharashtra-Style Split in West Bengal? पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याभोवती नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षातील काही नेत्यांची नाराजी, दोन आमदारांवर झालेली कारवाई आणि काही गुप्त बैठकींच्या चर्चांमुळे टीएमसीमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या घडामोडींची तुलना महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीशी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून टीएमसीमधील अंतर्गत अस्वस्थता उघडपणे दिसून येत आहे. पक्षविरोधी कारवायांचा आरोप ठेवत दोन आमदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर काही नेते आणि कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. काही असंतुष्ट नेत्यांच्या बैठका झाल्याच्या चर्चांमुळे पक्षातील मतभेद अधिकच चर्चेत आले आहेत.

काही आमदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. काही 50 ते 60 आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील घडामोडींची आठवण काढली जात आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारत मोठा गट सोबत घेतला होता. त्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरही मोठा संघर्ष झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याने पक्षात विभागणी झाली. या दोन्ही घटनांमुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.

पश्चिम बंगालमध्ये सध्या तशी परिस्थिती निर्माण झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्रातील बंड आणि बंगालमधील सद्यस्थिती यामध्ये महत्त्वाचा फरक आहे. महाराष्ट्रात बंडखोर आमदारांनी उघडपणे नेतृत्वाविरोधात भूमिका घेतली होती, तर बंगालमध्ये अद्याप कोणत्याही मोठ्या गटाने सार्वजनिकरीत्या पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलेले नाही.

स्वतः ममता बॅनर्जी यांनीही पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करत पक्षाची ताकद तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे सांगितले. तसेच पक्षशिस्त मोडणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेतही त्यांनी दिले.

सध्याच्या परिस्थितीत टीएमसीमध्ये नाराजी असल्याचे चित्र नक्कीच दिसत असले, तरी लगेचच महाराष्ट्रासारखी मोठी राजकीय उलथापालथ होईल, असे स्पष्ट संकेत अद्याप मिळालेले नाहीत. मात्र आगामी काळात पक्षातील असंतोष वाढतो की नेतृत्व त्यावर नियंत्रण मिळवते, यावर टीएमसीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील या घडामोडींवर केवळ राज्याचेच नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT