कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील (TMC) मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पक्षाच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यात वाद सुरू झाल्याचे समोर येत आहे. अभिषेक हे तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. या भांडणाचा फटका राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना बसला आहे.
या वादात प्रशांत किशोर अडकले असून, तृणमूलचे काही नेते त्यांना लक्ष्य करू लागले आहेत. तृणमूलच्या नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य आणि प्रशांत किशोर आय-पॅकमध्ये जाहीरपणे वाद सुरू झाला आहे. भट्टाचार्य यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा आयपॅकने गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भट्टाचार्य यांनी म्हटले आहे की, निवडणुकीआधी आय-पॅकने माझ्या नावाने ट्विटर खाते सुरू केले होते. आज त्यावर कुणीतही मला माहिती न देता थेट एक व्यक्ती, एक पद याबद्दल ट्विट केले. याचा मी जाहीरपणे निषेध करते.
आय-पॅकने त्यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. आय-पॅकने म्हटले आहे की, आम्ही तृणमूलच्या एकाही नेत्याचे डिजिटल अकाउंट हाताळत नाही. आम्ही सोशल मीडिया अकाऊंट हाताळत असल्याचे कुणी म्हणत असेल तर त्यांना याबद्दल चुकीची माहिती असेल अथवा ते खोटे बोलत असतील. तृणमूल काँग्रेसनेच या प्रकरणात लक्ष घालावे. त्यांच्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा गैरवापर कशाप्रकारे होत आहे, हे त्यांनी शोधावे.
एक व्यक्ती, एक पद या धोरणाचा आग्रह अभिषेक बॅनर्जी यांनी धरला आहे. पक्षात ममतांनंतर अभिषेक हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या या धोरणाला पक्षाच्या जुन्या नेत्यांचा विरोध आहे. काही जणांच्या मते, ममता आणि त्यांचे अतिशय महत्वकांक्षी भाचे अभिषेक यांच्यातील संघर्ष वाढू लागल्याची ही चिन्हे आहेत. पक्षांतर्गत हा वाद वाढू लागताच ममतांनी तातडीने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आज बोलावली आहे. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत ममता या अभिषेक यांच्याबाबत मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा सुरू आहे.
ममतांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रचारासाठी हा दौरा होता. त्यावेळी ममतांना गोव्यातील प्रचाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. गोव्यात कुणीतरी प्रचार करीत असताना मी जाणार नाही. मी दुसरीकडे जाईन. यातून सगळ्यांचे हित साधले जाईल, असे टिप्पणी ममतांनी केली होती. त्यांनी अभिषेक यांचा उल्लेख कुणीतरी असा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता काही दिवसांतच तृणमूलमधील वाद उफाळून आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.