1 एप्रिलपासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. वारंवार टोल नाके पार करणाऱ्यांच्या खिशाला आता थोडी जास्त कात्री बसणार आहे. कारण वार्षिक टोल पासच्या दरात वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांना येत्या आर्थिक वर्षापासून वार्षिक पाससाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्णयानुसार 1 एप्रिल 2026 पासून वार्षिक टोल पासची किंमत वाढणार आहे. आतापर्यंत वाहनचालकांना या पाससाठी 3000 रुपये भरावे लागत होते. मात्र आता नवीन दरानुसार हा पास घेण्यासाठी 3075 रुपये मोजावे लागणार आहेत. ही नवीन दररचना आर्थिक वर्ष 2026-27 साठी लागू केली जाणार आहे.
हा वार्षिक टोल पास केवळ खासगी आणि नॉन-कमर्शियल वाहनांसाठीच उपलब्ध असतो. या पासचा लाभ घेण्यासाठी वाहनावर सक्रिय फास्टॅग असणे अनिवार्य आहे. फास्टॅगमुळे टोल नाक्यांवर थांबण्याची गरज राहत नाही आणि थेट डिजिटल पद्धतीने शुल्क वसूल केले जाते. वार्षिक टोल पासची वैधता एक वर्ष किंवा 200 वेळा टोल नाके पार करेपर्यंत असते. म्हणजेच एखाद्या वाहनाने 200 वेळा टोल प्लाझा पार केला, तर पासची वैधता संपुष्टात येते. जरी त्या पासला एक वर्ष पूर्ण झालेले नसले तरी 200 वेळा टोल पार झाल्यावर तो अमान्य ठरतो.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना १ एप्रिल २०२६ पासून नवीन दर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या बदलाची माहिती वाहनचालक आणि संबंधित घटकांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे. सरकारच्या नियमानुसार टोलशी संबंधित दरांचा दरवर्षी आढावा घेतला जातो आणि गरजेनुसार त्यामध्ये बदल केले जातात. त्याच प्रक्रियेअंतर्गत यंदा वार्षिक पासच्या शुल्कात ही किरकोळ वाढ करण्यात आली आहे. ज्यांचा राष्ट्रीय महामार्गावर वारंवार प्रवास असतो, त्यांच्यासाठी वार्षिक टोल पास आजही सोयीचा पर्याय मानला जातो. कारण प्रत्येक वेळी टोल भरण्याची गरज राहत नाही आणि प्रवास अधिक जलद होतो.
वार्षिक टोल पास घेण्यासाठी वाहनधारकांना त्यांच्या फास्टॅग खात्याशी संबंधित पोर्टलवर लॉग-इन करून अर्ज करावा लागतो. हा अर्ज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर किंवा फास्टॅग सेवा देणाऱ्या बँक अथवा अॅपद्वारे करता येतो. अर्ज करताना निश्चित शुल्क म्हणजेच 3075 रुपये ऑनलाइन भरावे लागतात. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर हा पास थेट फास्टॅगशी जोडला जातो आणि त्यानंतर टोल नाक्यांवर अतिरिक्त पैसे न भरता वाहनचालक प्रवास करू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.