Narendra Modi and Biplab Kumar Deb
Narendra Modi and Biplab Kumar Deb  Sarkarnama
देश

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांची विकेट! भाजप सोडलेल्या नेत्याचा दावा खरा ठरणार?

सरकारनामा ब्युरो

आगरतळा : त्रिपुरामध्ये भाजपचं (BJP) सरकार मुदतीआधीच कोसळेल, असा दावा भाजप सोडणाऱ्या एका बड्या नेत्यानं काही दिवसांपूर्वी केला होता. यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्रिपुरातील विधानसभेची निवडणूक (Assembly Election) काही महिने आधीच होईल, असे संकेत या नेत्यानं त्यावेळी दिले होते. यानंतर आज मुख्यमंत्री विप्लवकुमार देव (Biplab Kumar Deb) यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

त्रिपुरात सत्तेत आल्यानंतर देव यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आज त्यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक राज्यात पोचले आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड आजच केली जाणार आहे. त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने देव यांना डच्चू दिल्याचे मानले जात आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर पक्षाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

देव यांनी राज्यपाल एस.एन.आर्य यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. राजीनामा दिल्यानंतर बोलताना त्यांनी पक्षाने संघटनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी दिल्याचं सांगितलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे (Tripura) माजी आरोग्य मंत्री सुदीप रॉय बर्मन (Sudip Roy Barman) आणि आशिष कुमार साहा (Ashish Kumar Saha) यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपलाही रामराम ठोकला होता. त्यानंतर दोघांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

भाजप सोडल्यानंतर बर्मन यांनी मोठा दावा केला होता. भाजपचे अनेक आमदार पक्ष सोडण्यास तयार आहेत. पण काही तांत्रिक कारणांमुळे ते काही महिने वाट पाहणार आहेत. प्रत्येक जण पक्षावर नाराज आहे. मला वाटते त्रिपुराची निवडणूक गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांसोबतच होईल, असं बर्मन म्हणाले होते. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने बर्मन यांची भविष्यवाणी खरी ठरण्याची चर्चा सुरू आहे. त्रिपुरामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक होणार आहे. तर गुजरात व हिमाचल प्रदेशातील निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT