Ashok Gehlot Sarkarnama
देश

‘पोलिसांच्या ट्रकमधून भाजपला पैसा पोहोचतो!महाराष्ट्रातील सरकार कांदा-बटाट्यावर बदलले नाही’

Ashok Gehlot : २००० रुपयांच्या नोटांमुळे कमी जागेत जादा रक्कम बसते. त्यामुळेच नोटबंदी झाली.

सरकारनामा ब्यूरो

जयपूर : निमलष्करी दल आणि पोलिसांच्या (Police) ट्रकमध्ये भरुन दोन नंबरचा पैसा (Money) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यालयात पोचवला जातो, असा गंभीर आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी केला आहे. तसेच, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र (Maharashtra), मध्य प्रदेश या राज्यांतील विरोधकांची सरकारे ही कांदा-बटाटे देऊन पडलेली नाहीत, अशी टीकाही गेहलोत यांनी केली आहे. (Money is delivered to BJP office from police trucks : Ashok Gehlot)

जयपूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अशोक गेहलोत यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यात निमलष्करी दल किंवा पोलिसांच्या ट्रकमधून पैसा आणला जातो. भाजप कार्यालयाच्या मागे हा ट्रक नेण्यात येतो. ती गाडी निमलष्करी दल आणि पोलिसांची असल्यामुळे तिला पकडणार तरी कोण? त्यात पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान असल्यामुळे लोकांना वाटतं या गाड्या त्यांच्याच आहेत. अशा पद्धतीने देशात हे मोठे षडयंत्र सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

गोवा, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील सरकारे ही काही कांदा-बटाट्यांनी पडलेली नाहीत, असा आरोप करून मुख्यमंत्री गेहलोत यांनी यामागे मोठी उलाढाल झाली असल्याचे सूचित केले आहे. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटीबंदी जाहीर केली. ज्यांना जादा जागा लागते, अशा ५००-१००० नोटा बंद केल्या. त्या वेळी १००० रुपयांची नोट बंद करुन त्यांनी २००० रुपयांच्या नोटा सुरु केल्या. कारण, पैशाची वाहतूक करताना २००० रुपयांच्या नोटांमुळे कमी जागेत जादा रक्कम बसते त्यामुळेच नोटबंदी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप गेहलोत यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांचे गुजरात मॉडेल फ्लॉप झाले आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी त्याची सुरुवात केली. त्याचा आधार घेत मोदी दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. पण, मुळात गुजरात मॉडेल वगैरे काही नव्हते. ते केवळ मार्केटिंग होते. आजही भाजप मार्केटिंगवर हजारो कोटी रुपये खर्च करीत आहे, असा आरोपही गेहलोत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT