Budget 2024 Sarkarnama
देश

Union Budget 2024 : पाच वर्षानंतर करदात्यांना दिलासा; 17,500 रुपये वाचणार...

Nirmala Sitharaman Modi Government Income Tax : निर्मला सीतारमण यांनी नवीन करप्रणाली स्वीकारणाऱ्या करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.  

Rajanand More

New Delhi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा दिला आहे. नव्या करप्रमाणीनुसार प्राप्तीकर भरणाऱ्या करदात्यांसाठी स्टँडर्ड डिडक्शनची (मानक वजावट) मर्यादा 50 हजारांवरून 75 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांचे 17 हजार 500 रुपये वाचणार आहेत.

सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जुनी करप्रणाली स्वीकारणाऱ्या करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. नवीन करप्रणालीमध्ये कररचनेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार 2019 नंतर पहिल्यांदाच स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 25 हजारांनी वाढवली आहे.

अर्थसंकल्पात कररचनेमध्येही काहीसा दिलासा देण्यात आला आहे. तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न पूर्वीप्रमाणेच करमुक्त असेल. दुसऱ्या स्लॅबची मर्यादा एक लाखांनी वाढवण्यात आली आहे. पूर्वी ३ ते ६ लाखापर्यंत पाच टक्के प्राप्तिकर भरावा लागत होता. आता ही मर्यादा 3 ते 7 लाख असेल.

7 ते 10 लाखापर्यंत (पूर्वी 6 ते 9 लाख) 10 टक्के, 10 ते 12 लाखांवर (पूर्वी 9 ते 12 लाख) 15 टक्के, 12 ते 15 लाखांवर 20 टक्के तर, 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के प्राप्तिकर द्यावा लागणार आहे.

नवीन करप्रमाणीनुसार कररचना

·         0-3 लाखांचे उत्पन्न – 00 टक्के कर

·         3 ते 7 लाख - 5 टक्के कर

·         7 ते 10 लाख - 10 टक्के कर

·         10-12 लाख - 15 टक्के कर

·         12-15 लाख - 20 टक्के कर

·         15 लाखांपेक्षा अधिक - 30 टक्के कर

स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय?

स्टँडर्ड डिडक्शन ही करदात्यांना त्यांच्या उत्पन्नावर दिली जाणारी विशेष सवलत आहे. करदात्यांची करपात्र रकमेतून ठराविक रक्कम वजावट करून उरलेल्या एकूण उत्पन्नावर कर आकारला जातो. सीतारमण यांच्या घोषणेनुसार ही रक्कम यावेळी 50 हजारांहून 75 हजार करण्यात आली आहे. ही मर्यादा 25 हजारांनी वाढवण्यात आल्याने प्रामुख्याने मध्यवर्गीय नोकरदारांना दिलासा देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT