Anurag Thakur with Narendra Modi
Anurag Thakur with Narendra Modi  Sarkarnama
देश

महागाईवर विचारताच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं काँग्रेस अन् गांधी परिवाराकडं बोट!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील 15 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. याचबरोबर स्वयंपाकाचा गॅस आणि सीएनजीही महागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. या महागाईबाबत विचारताच भाजप (BJP) नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेससह गांधी परिवाराकडे बोट दाखवले आहे. (Petrol Diesel price hike News)

देशातील वाढत्या महागाईवर विचारताच अनुराग ठाकूर हे काँग्रेसवर घसरले. ते म्हणाले की, काँग्रेसला गांधी परिवाराच्या पलिकडे काही दिसत नाही. राहुल गांधी यांनी धुरा हाती घेऊनही त्यांना पश्चिम बंगालमध्ये एकही जागा मिळाली नाही. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशची जबाबदारी हाती घेतल्यानंतर डिपॉझिट जप्त झाले आणि केवळ दोन जागा जिंकता आल्या. आता पुन्हा सोनिया गांधी यांच्यावर पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आली आहे.

श्रीलंकेपेक्षा भारतातील आर्थिक स्थिती बिकट असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यावर बोलताना ठाकूर म्हणाले की, सध्याची जगातील आणि देशातील परिस्थिती पाहिल्यास भारताची स्थिती चांगली आहे. भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे योग्य नेतृत्व निवडले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. कोरोना संकटाच्या काळातही केंद्र सरकारने अर्थव्यवस्था भक्कम ठेवली आणि तिची वाढ केली. आम्ही जनतेला मोफत अन्नधान्य दिले. याचबरोबर 80 कोटी जनतेला मोफत कोरोना लसही दिली आहे. हे केवळ मोदींमुळेच घडू शकले आहे.

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 15 दिवसांत 13 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 8.40 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.61 रुपये झाला असून, डिझेलचा दर 95.87 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 85 पैसे वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 119.76 रुपये आणि डिझेलचा दर 103.92 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी आधीच दिला होता.

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 110 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT