नवी दिल्ली : देशातील वाहन उद्योगामध्ये अमूलाग्र बदल घडवण्याचा चंग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बांधला आहे. आज त्यांनी वाहन उद्योगाबाबत मोठी घोषणा केली आहे. कारला (Car) यापुढे सहा एअरबॅग (Airbags) बंधनकारक असणार आहेत. याबाबतच्या मसुद्याला परवानगी देण्यात आली आहे, असे गडकरींनी म्हटले आहे.
सरकारने कारला दोन एअरबॅग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून, तो याच वर्षी 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. यामुळे देशात विक्री होणाऱ्या स्वस्तात स्वस्त नवीन कारलाही दोन एअरबॅग असणे बंधनकारक आहे. आता गडकरींनी ट्विटरवरून कारला सहा एअरबॅग बंधनकारक करण्याची घोषणा केली आहे. गडकरींनी ट्विटरवर म्हटले आहे की, कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आठपर्यंत प्रवासी क्षमता असलेल्या कारला किमान सहा एअरबॅग असणे बंधनकारक आहे. याबाबतच्या मसुद्याला सरकारने मंजुरी दिली आहे.
मंत्रालयाने आता कारमध्ये मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे. कारला सर्वसाधारणपणे पुढे दोन एअरबॅग असतात. आता मागील प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांच्यासाठीही कारमध्ये एअरबॅग बसवण्यात येतील. मागील वर्षीच गडकरींनी वाहन उत्पादक कंपन्यांना याबाबत आवाहन केले होते. गडकरींच्या या निर्णयामुळे प्रवाशांची सुरक्षा वाढणार असली तरी कारची किंमतही वाढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, गडकरींनी जुनी वाहने भंगारात काढणाऱ्या (Vehicle Scrapping Policy) वाहनमालकांसाठी नुकतीच मोठी घोषणा केली होती. गडकरी म्हणाले होते की, जुनी वाहने भंगारात काढल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन वाढेल. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणांतर्गत वाहनमालकांना अधिकाधिक कर सवलती देण्याबाबत माझी अर्थ मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. या धोरणांतर्गत जास्त सवलती द्याव्यात, अशी विनंती मी जीएसटी परिषदेला करणार आहे. सध्या जुनी वाहने भंगारात काढून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना राज्ये पथ करावर 25 टक्के परतावा देत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.