RCP Singh
RCP Singh  Sarkarnama
देश

राज्यसभेचा पत्ता कट होताच केंद्रीय मंत्री म्हणाले, आभारी आहे!

सरकारनामा ब्युरो

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी विश्‍वासू सहकारी व केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह (RCP Singh) यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी झारखंडचे संयुक्त जनता दलाचे (JDU) प्रदेशाध्यक्ष खिरू महातो यांना संधी दिली. सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानं आता त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदावरही गंडांतर आलं आहे. यावर आरसीपी सिंह यांनी प्रतिक्रिया देत केवळ आभार मानले आहेत. (Rajya Sabha Election News Updates)

नितीशकुमार यांनी आरसीपी सिंह यांना डावलल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सिंह हे राज्यसभेचे दोनदा सदस्य राहिले आहेत. तिसऱ्यांदाही त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा होती. पण त्यांचा पत्ता कट करण्यात आला. यावर सिंह यांनी आभारी आहे, अशी भावना व्यक्त केली. जो काही निर्णय घेतला गेला आहे, तो माझ्या हिताचा आहे. आजपर्यंत कुणालाही त्रास होईल, असं काहीही मी केलेलं नाही, असेही सिंह यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? यावर त्यांनी हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार असून, मी त्यांना दिल्लीत जाऊन भेटणार आहे, असं स्पष्ट केलं.

जेडीयूने राज्यसभेसाठी नाव निश्‍चित करण्यासाठी नितीशकुमार यांना सर्वाधिकार दिले होते. आरसीपी सिंह हे मोदी यांच्या मंत्रिमंडळात पोलाद खात्याचे मंत्री आहेत. मागील काही काळापासून सिंह यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. ते भाजपची मुक्तकंठाने स्तुती करताना दिसत होते. आता नितीश यांनी सिंह यांना डच्चू देऊन महातोंना उमेदवारी दिली आहे. समता पक्ष स्थापनेच्या काळापासून नितीशकुमार यांना महातोंनी साथ दिली आहे. यामुळे आगामी काळात भाजपला (BJP) केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करावे लागणार आहेत.

नितीशकुमार हे सिंह यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत पाठवण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. भाजपने मात्र, आपल्या कोट्यातील दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे सिंह यांना सोईस्करपणे डावलण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. यातून नितीशकुमारांनी भाजपलाही धक्का दिल्याचं मानलं जात आहे. यामुळं केंद्रीय मंत्रिमंडळातू सिंह यांना वगळलं जाईल. संयुक्त जनता दलाचा एकही सदस्य मंत्रिमंडळात असणार नाही. मागील काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या नितीशकुमारांनी यातून थेट संदेश दिल्याचे दिसत आहे.

केंद्रीय मंत्री राज्यसभेचे तिकीट कापण्यात आल्याचे अपवाद आहेत. केंद्रीय मंत्री असताना आरसीपी सिंह यांनी समांतर सत्ताकेंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं त्यांना पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आलं आहे. नितीशकुमार यांचे निकटवर्ती आणि पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांच्याशीही आरसीपी सिंह यांचे मागील काही दिवसांपासून बिनसले होते. त्यामुळं पक्षात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर सिंह यांना उमेदवारी नाकारून नितीशकुमार यांनी एकाच बाणात अनेक पक्षी मारल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT