Yogi Adityanath, First Phase voting in UP Sarkarnama
देश

UP Election Updates : आज पहिला टप्पा अन् योगी मतदारांना म्हणाले, चुक केली तर...!

पहिल्या टप्प्यातील 58 मतदारसंघातील 623 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पहिल्या टप्प्यातील मतदान आज (ता. 10) होत आहे. या टप्प्यातील 58 मतदारसंघातील 623 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. प्रामुख्याने राज्यातील पश्चिम भागातील जाट समाजाचा प्रभाव असलेले हे मतदारसंघ आहेत. मतदानाला सुरूवात होण्याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yodi Adityanath) यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केलं आहे. (UP Election Updates)

योगी आदित्यनाथ यांनी भाजपला (BJP) मतदान करण्याच आवाहन केले आहे. तसेच मतदारांना सतर्कही केलं असून ते म्हणाले, भयमुक्त जीवन देणे, ही प्रत्येक सरकारची प्राथमिकता आहे. पण आज मला एकच चिंता आहे. आतंक निर्माण करणारे सतत धमकावत आहेत. आमचं सरकार येऊ द्या, असं म्हणत आहेत. मतदारांनो, यावेळी तुम्ही चुकला तर पाच वर्षांच्या माझ्या कामावर पाणी फिरेल. यावेळी उत्तर प्रदेशला काश्मीर, केरळ आणि बंगाल बनायला वेळ लागणार नाही. तुमचं मत माझ्या पाच वर्षाच्या तपस्येला आशिर्वाद तर आहेच पण येणाऱ्या पाच वर्षात तुमच्या भयमुक्त जीवनाची गॅरंटीही असेल, असं आवाहन योगींनी केलं आहे. (UP Election 2022 Phase 1 Polling Live)

मागील पाच वर्षात भाजपच्या डबल इंजिनच्या सरकारने प्रामाणिकपणे काम केले आहे. निवडणुकीपर्यंत येता-येता तुम्ही सर्वकाही पाहिले आहे. मागील पाच वर्षात खूप काही अभूतपुर्व झाले आहे. कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडला आहे. आमच्या आधीच्या सरकारच्यावतीने मी क्षमा मांगतो की, मागील 70 वर्षात त्यांनी काम केले नाही. आम्ही राज्यातील सर्व गावांपर्यंत वीज पोहचवली आहे. प्रत्येक घरी शौचालयाची सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांना आत्मसन्माने जगता यावे, यासाठी अनेक योजना केल्या आहेत. प्रत्येक घरी पाणी पोहचवले जात आहे. उद्योग क्षेत्रात राज्याने मोठी भरारी घेतली आहे. कोरोना काळात 15 कोटी लोकांपर्यंत मोफत रेशन पोहचवले, असे योगी यांनी सांगितले.

हे माझे कर्तव्य होते. त्याचे निष्ठेने पालन केले. मागील सरकारच्या तुलनेत ही विक्रमी कामगिरी आहे. पाच वर्षांत एकाही घोटाळ्याचे आरोप झाला नाही. मी योगी आहे, माझ्या भगव्यावर कोणत्याही घोटाळ्याचा आरोप नाही. आज आपला उत्तर प्रदेश गुंडगिरी, अपराशी, आतंकापासून मुक्त आहे. पलायन केलेले हिंदू घरी परत आले आहेत. त्यांना धमकावणारी तुरूंगात आहेत. पोलीस कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय काम करत आहेत, असेही योगी म्हणाले.

कोणत्या मतदारसंघात आज मतदान?

उत्तर प्रदेशातील शामली, हापूर, गौतम बुध्द नगर, मुझफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाझियाबाद, बुलंदशहर, अलीगड, मथूरा आणि आग्रा या 11 जिल्ह्यांतील 58 मतदारसंघात आज पहिल्या टप्यातील मतदान होत आहे. त्यानंतर 14, 20, 23 आणि 27 फेब्रुवारी तसेच 3 व 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT