आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. विशेषतः महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने नवी रणनीती आखली असून, उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला विस्तारकांची फौज उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या अभियानासाठी महाराष्ट्रासह आठ राज्यांतील महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या महिला विस्तारकांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आणि महिला मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिला मोर्चाला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्याचबरोबर योजनांच्या लाभार्थी महिलांशी संपर्क वाढवून पक्षाचा जनाधार मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
आठ राज्यातील महिला विस्तारक
भाजपच्या महिला मोर्चाची राज्यस्तरीय 'प्रवासी बैठक' शुक्रवारी लखनऊ येथे पार पडली. या बैठकीत उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा मतदारसंघांसाठी महिला विस्तारकांच्या नियुक्तीचा निर्णय जाहीर करण्यात आला.
या अभियानासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, बिहार, झारखंड आणि राजस्थान या आठ राज्यांतील 403 महिला विस्तारकांची निवड करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांवर उत्तर प्रदेशातील मतदारसंघनिहाय जनसंपर्काची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य, प्रदेश महामंत्री (संघटन) धर्मपाल सिंह, प्रदेश सहप्रभारी खासदार मेधा कुलकर्णी, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रूप कुमारी चौधरी आणि प्रदेशाध्यक्ष सरोज कुशवाहा उपस्थित होत्या.
प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची रणनीती
महिला विस्तारकांच्या माध्यमातून भाजपने थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे. या पदाधिकारी आपापल्या मतदारसंघांमध्ये घरोघरी भेटी देणार आहेत. विशेषतः महिला मतदार, सरकारी योजनांच्या लाभार्थी आणि स्थानिक महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर असेल.
महिला सक्षमीकरण, आर्थिक मदत आणि इतर कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच बूथ स्तरावरील पक्षसंघटना अधिक सक्रिय करण्याची जबाबदारीही महिला विस्तारकांवर असणार आहे.
विनोद तावडेंनी सांगितली निवडणुकीची रणनीती
या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महिला विस्तारकांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. उत्तर प्रदेशातील सर्व 403 विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला विस्तारक दौरे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्यांदरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच सरकारच्या कामगिरीबाबत थेट संवाद साधून पक्षाचे जनसंपर्क अभियान अधिक गतिमान करण्याची जबाबदारी महिला विस्तारक पार पाडणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
बूथ पातळीवर संघटना मजबूत करण्यावर भर
उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनीही या बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीची तयारी ही केवळ राजकीय प्रक्रिया नसून, संघटनेची सामूहिक ताकद आणि तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता वाढवण्याचा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत महिला पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशातील सर्व 403 मतदारसंघांसाठी स्वतंत्र महिला विस्तारकांची नियुक्ती करण्याच्या निर्णयातून भाजपने महिला मतदारांशी संपर्क वाढवण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. महाराष्ट्रासह आठ राज्यांतील पदाधिकाऱ्यांना या अभियानात सहभागी करून घेतल्यामुळे निवडणुकीपूर्वी मतदारसंघनिहाय संघटनात्मक बांधणीला वेग देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.