Kamala Harris, Usha Chilukuri Sarkarnama
देश

US President Election 2024 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुणीही झाले तरी उपराष्ट्राध्यक्षांचे असे असेल ‘INDIA’ कनेक्शन

Rajanand More

New Delhi : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे. त्यातच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर वातावरण अधिकच तापलं आहे. हल्ल्यानंतर सोमवारी त्यांना रिपब्लिकन पक्षाने पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. तर उपराष्ट्राध्यपदासाठी जेडी वेंस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अध्यक्ष कुणीही झाले तरी उपराष्ट्राध्यक्षांचे भारताशी थेट नाते असणार आहे.

जेडी वेंस यांच्या पत्नी उषा चिलुकुरी या भारतीय वंशाच्या आहेत. सॅनफ्रांसिस्कोमध्ये त्या वकील आहेत. उषा यांचे आई-वडील आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात पमारू गावच रहिवासी होते. वेंस यांच्या उमेदवारीची घोषणा झाली त्यावेळी उषा तिथेच उपस्थित होत्या.

उषा यांचे आई-वडील अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. तिथेच उषा यांचा जन्म झाला. येल विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असताना जेडी वेंस यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर 2014 मध्ये दोघांनी विवाह केला. या दोघांना तीन मुलं आहेत. आता उषा आपल्या पतीच्या प्रचारात सक्रीय सहभागी झाल्या आहेत.

उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस या जेडी यांच्या विरोधात आहेत. सध्या कमला हॅरिस यांच्याकडेच हे पद आहे. त्या भारतीय वंशाच्या आहेत. पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या आई भारतीय तर वडील जमैका येथील आहेत.

कमला हॅरिस यांच्या आई श्यामला गोपालन तमिळनाडूतील थुलासेंद्रापुरम या गावात राहत होत्या. एकोणिसाव्या वर्षी त्या अमेरिकेत गेल्या होत्या. हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियात झाला असून त्या सिनेटमधील तीन आशियाई अमेरिकी सदस्यांपैकी एक आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात त्या फिमेल ओबामा म्हणून लोकप्रिय होत्या.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT