Uttar Pradesh Bypolls : महाराष्ट्रासह झारखंडमध्ये विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून उत्तर प्रदेशातही नऊ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. मतदानादिवशी उत्तर प्रदेशातील काही मतदान केंद्रांवर मतदारांची ओळखपत्र पोलिसांनी तपासल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांनीच महिला मतदारांवर पिस्तूल रोखल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
समाजवादी पक्षाने केलेल्या तक्रारीनंतर संबंधित मतदान केंद्रांवरील सात पोलिसांनी निलंबित करण्यात आले आहे. ओळखपत्र तपासणीवरून आयोगाने ही कारवाई केली असून निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडली जावी, असे सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, मतदान करण्यापासून कोणत्याही पात्र मतदाराला रोखता येऊ शकत नाही. मतदान प्रक्रिया सुरू असताना पक्षपातीपणा खपवून घेतला जाणार नाही. तक्रार आल्यानंतर त्याची तातडीने चौकशी केली जाईल. कुणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशात गाझियाबाद, कटहरी, खेर, कुंदरकी, करहल, माझवान, मीरापूर, फुलपूर आणि सिसामाऊ या नऊ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पोलिसांबाबत तक्रार केली आहे. पोलिसांकडून बेकायदेशीरपणे मतदारांची मतदार ओळखपत्र, आधार कार्ड तपाले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. प्रामुख्याने मुस्लिम महिलांचीच ओळखपत्र तपासली जात असल्याचा दावा त्यांनी केला होता.
त्याचप्रमाणे अखिलेश यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करून तो मीरापूर मतदारसंघातील असल्याचा दावा केला आहे. महिला मतदारांवर एक पोलिस अधिकारी पिस्तूल रोखताना दिसत आहे. पोलिस मतदारांना मतदान कऱण्यापासून रोखत असल्याच आरोप करत अखिलेश यांनी कारवाई मागणी केली आहे.
दरम्यान, या मुद्यावरून समाजवादी पक्ष आणि भाजप आमनेसामने आले आहेत. हिजाब काढून ओळख पटवण्यात काहीच गैर नसल्याच दावा भाजपने केला आहे. पासपोर्ट काढताना ओळख दाखवावी लागते मग मतदान करताना काही, असा सवाल भाजपने केला आहे. अखिलेश यांनी मात्र पोलिसांना ओळखपत्र तपासण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांच्यावर कडक करावाई करण्याची मागणी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.