uttar pradesh cm yogi adityanath welcomes jitin prasada in bjp
uttar pradesh cm yogi adityanath welcomes jitin prasada in bjp  
देश

जितिन प्रसाद यांच्यावर मोठी जबाबदारी; योगींनी दिले संकेत

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  यांनी प्रसाद यांचे स्वागत केले असून, त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. 

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज होते. 

प्रसाद यांच्या पक्षप्रवेशाचे योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचे चित्र आहे. यामुळे काँग्रेसचा राज्यातील ब्राह्मण चेहरा असलेले जितिन प्रसाद यांचा भाजप प्रवेशासाठी फायद्याचा ठरणार आहे. त्यांच्यावर राज्यात मोठी जबाबदारी देऊन ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. याबाबतचे संकेच योगींनीही दिले आहेत. 

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे प्रसाद यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळेल, असा अंदाज आहे. प्रसाद यांच्या पक्षप्रवेशाबद्दल योगींनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या जितिन प्रसाद यांचे स्वागत आहे. त्यांच्या प्रवेशाने उत्तर प्रदेशात भाजपला जरुर बळकटी मिळेल. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जितिन प्रसाद यांना आगामी विधानसभा निवडणुकांआधी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यांना विधान परिषदेवर पाठवले जाऊ शकते. याचबरोबर पक्षात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांना मोठे पद दिले जाऊ शकते. प्रसाद यांच्यामुळे पक्षाला बळकटी मिळेल, असे सांगून योगींनीही याचे संकेत दिले आहेत. 

राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. 

Edited by Sanjay jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT