Keshav Prasad Maurya, Yogi Adityanath, Brajesh Pathak Sarkarnama
देश

Yogi Adityanath : दोन उपमुख्यमंत्र्यांचे थेट मुख्यमंत्र्यांना खुलं चॅलेंज; भाजपची डोकेदुखी वाढली...

Rajanand More

Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर भाजपमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे बाहेर येऊ लागली आहे. पक्षाच्या १४ जुलैला झालेल्या कार्यसमितीची बैठकीनंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जणू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मोर्चा उघडला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्याकडून योगींविरोधात किंवा पक्षाविरोधात कोणतेही वक्तव्य केले जात नाही. मात्र, त्यांनी काहीही न बोलताच आपल्या कृतीतून सूचक इशारा देण्यास सुरूवात केली आहे. मौर्य यांनी पक्षाच्या बैठकीनंतर दहा दिवसांत ४३ आमदार, दोन विधान परिषदेचे आमदार आणि जवळपास दहा मंत्री, तीन केंद्रीय मंत्री, आजी-माजी खासदार, आमदारांची भेटी घेत त्याचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.

मौर्य यांच्याकडून सरकारी अथवा पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियात शेअर करताना योगींना टॅग केले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व इतर नेत्यांना टॅग करण्यास मात्र ते विसरत नाहीत. त्यामुळेच मौर्य यांच्याकडून योगींना खुले चॅलेंज दिले जात असल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीनंतर योगींनी बोलावलेल्या कॅबिनेटच्या बैठकीला मौर्य यांच्यासह पाठकही हजर नव्हते. कार्यसमितीच्या बैठकीत मौर्य यांनी अप्रत्यक्षपणे योगींना जबाबदार धरले होते. हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहचले होते. पण त्यानंतरही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कृतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.     

पक्षामध्ये आपल्याबाजूने किती नेते आहेत, हेच दाखवण्याचा प्रयत्न सध्या मौर्य यांच्याकडून सुरू आहे. हे शक्तीप्रदर्शन आहे की आणखी काही, याबाबतही चर्चा सुरू आहेत. मौर्य यांना भेटले नेते काही कामानिमित्तही भेटलेले असू शकतात. पण बैठकीनंतर लागलेली ही रीघ राजकीय विचार केल्यास काहीतरी वेगळेच चित्र रंगवत असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

एकाचवेळी दोन्ही उपमुख्यमंत्री एकाचवेळी योगींना टार्गेट करत असल्याने पुढील काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. लवकरच राज्यात विधानसभेच्या दहा जागांसाठी पोटनिवडणूक होऊ शकते. लोकसभेतील पराभवानंतर ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत हे तिघे एकत्रित दिसणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT