Key BJP Leadership Contributions in Bihar Elections : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाआघाडीचा सुपडासाफ झाला आहे. एनडीएच्या त्सुनामीमध्ये सर्वच विरोधी पक्ष वाहून गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या जोडीची रणनीती यशस्वी ठरली असून बिहारच्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या विजयामध्ये महाराष्ट्रातील एका नेत्याचाही मोठा वाटा आहे.
बिहारचे भाजप प्रभारी व राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे ते नाव आहे. मागील काही वर्षांपासून ते बिहारमध्ये विजयासाठी प्रयत्नशील होते. सप्टेंबर 2022 मध्ये विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाली. पुढच्याच महिन्यात बिहारमध्ये नितीश कुमार भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत गेले. भाजपसाठी हा मोठा धक्का होता.
लोकसभा निवडणुकीआधी भाजपने या धक्क्यातून सावरत नितीश कुमार यांना पुन्हा एनडीएमध्ये आणले. यामध्ये विनोद तावडे यांचा मोठा हातभार असल्याचे मानले जाते. त्यांनी जानेवारी 2024 मध्ये नितीश कुमार आणि भाजपला पु्न्हा जवळ आणले. आता पुन्हा भाजप सत्तेपर्यंत पोहोचली आहे. यातही विनोद तावडे यांची महत्वाची भूमिका आहे. निवडणुकीआधी मतदारसंघानुसार रणनिती आखणे, विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध घटकातील लोकांना भाजपसोबत जोडण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
उमेदवारांची निवड आणि प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी तावडे यांनी पडद्यामागून महत्वाची जबाबदारी पार पाडल्याचे मानले जात आहे. त्यांच्या पडद्यामागील हालचालीही भाजपच्या विजयात मोलाच्या ठरल्या आहेत. बिहारच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे त्यांचा मोर्चा वळणार आहे.
महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपच्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत विनोद तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. ते स्टार प्रचारक म्हणून राज्य पिंजून काढणार आहे. पण हे करता करता त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातही आपली ताकद दाखवून देण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे बिहारमधील विजयाचे कोणते बक्षिस तावडेंना मिळणार, याबाबतही चर्चा आहे.
विनोद तावडे सध्या राष्ट्रीय पातळीवर सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणखी मोठी संधी मिळणार की महाराष्ट्राच्या राजकारणात पुनरागमन होणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, तावडेंनी राष्ट्रीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे, हे बिहारच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.