Pramod Sawant and Vishwajit Rane  Sarkarnama
देश

भाजपची खेळी; मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेल्या राणेंनाच घ्यायला लावलं नाव!

गोव्यात पुन्हा एकदा प्रमोद सावंत पर्व सुरू झालं आहे. सोमवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात (Goa) पुन्हा एकदा प्रमोद सावंत पर्व सुरू झालं आहे. सोमवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या रेसमध्ये विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांचं नावही आघाडीवर होतं. त्यांच्याकडून त्यासाठी फिल्डींगही लावण्यात आली होती, असं समजतं. पण भाजप (BJP) नेतृत्वानं त्यांना अलगद बाजूला सारत सावंत यांना पसंती दिली. एवढंच नाही तर राणेंच्या तोंडूनच सावंत यांचा नावाचा बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला.

भाजपनं गोव्यात २० जागा मिळवत पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी दहा दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला होता. काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना डच्चू मिळण्याची चर्चा सुरू होती. पण मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट त्यांनी घेतली अन् मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा सावंत यांच्या गळ्यात टाकण्याचा निर्णय भाजपने घेतला.

साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ ६६६ मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे सावंतांची विकेट पडून मुख्यमंत्रिपदासाठी दुसरे नाव पुढे केले जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. विश्वजित राणे हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. राणे हे आरोग्यमंत्री होते. ते आणि त्यांच्या पत्नी असे दोघेही विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. राणे यांचीही दिल्लीवारी झाली होती. पण पक्ष नेतृत्वाने सावंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.

गोवा विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. सोमवारी गोव्यासाठी भाजप नेतृत्वाने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि एल. मुरूगन यांना निरीक्षक म्हणून पाठवले. या निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. बैठकीत राणे यांनी सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर सर्वांनी सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. पुढील पाच वर्ष ते पक्षाचे विधीमंडळातील नेते अशतील, असं तोमर यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT