नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या (West Bengal) बीरभूम (Birbum) जिल्ह्यातील रामपूरहाट येथे 8 लोकांना जिवंत जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राजकारण तापले असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप एका तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यावर करण्यात आला आहे. या नेत्याला ताबडतोब अटक करण्याचे आदेश ममतांनी पोलिसांना दिले आहेत.
ममतांनी आज रामपूरहाटमध्ये पोचल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. या प्रकरणी तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या घटनेत ज्यांची घरे जाळण्यात आली त्यांना दोन लाख रूपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. या प्रकरणात स्थानिक तृणमूल नेते अनारुल शेख यांचे नाव जोडले जात आहे. त्यांना ताबडतोब अटक करावी, असे निर्देशही ममतांनी दिले.
लोक पळून गेले, यासारखी कोणत्याही प्रकारची कारणे मला देऊ नका. याला जबाबदार असलेल्या दोषींना आणि पोलिसांना शिक्षा व्हायलाच हवी. या प्रकरणातील साक्षीदारांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, असे ममता बॅनर्जी या वेळी म्हणाल्या. पीडितांच्या कुटुंबांना नोकरीचे आश्वासन देऊन त्यांना तातडीने मदतीचे धनादेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, असेही ममतांनी म्हटले आहे.
नेमकं काय घडलं?
रामपूरहाट जवळील बोगटुई गावात जमावाने काही घरांना आग लावली होती. घरांना बाहेरुन कड्या लावून ही आग लावण्यात आली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. ही घटना 22 मार्चला घडली होती. तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते भादू शेख यांची गावठी बॉम्बने हल्ला करून हत्या झाली होती. याचा सूड उगवण्यासाठी रामपूरहाटमध्ये हिंसाचार करण्यात आल्याचे समोर येत आहे. या हिंसाचारात ठार झालेले सर्व एकाच कुटुंबातील होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.