Suvendu Adhikari
Suvendu Adhikari Sarkarnama
देश

वाद पेटला! पोलीस कुलूप तोडून थेट विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातच घुसले

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावरच पोलिसांनी छापा टाकल्यानं राजकारण तापलं आहे. पोलिसांनी दहा गाड्यांसह मोठा फौजफाटा घेऊन ही कारवाई केली. विशेष म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभागानं तृणमूलच्या नऊ नेत्यांना नोटीस बजावल्यानंतर 24 तासांतच ही कारवाई करण्यात आली.

विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्या नंदिग्राममधील कार्यालयावर पोलिसांनी छापा मारला. या वेळी दहा गाड्यांसह पोलीस फौजफाटा दाखल झाला होता. पोलिसांनी आधी परिसरात चौकशी केली. नंतर कार्यालयाचे कुलूप काढून पोलिसांनी तपासणी केली. या छाप्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, भाजप कार्यकर्ते देवव्रत मैती यांची विधानसभा निवडणुकीनंतर 3 मे 2021 रोजी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी सीबीआयने तृणमूलच्या नऊ नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर लगेचच अधिकारींच्या कार्यालयावर छापा पडल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

या छाप्याबाबत पूर्व मिदनापूरचे पोलीस अधीक्षक अमरनाथ के म्हणाले की, नंदिग्राममधील एका नेत्याच्या पत्नीला बनावट कागदपत्रांद्वारे सहकारी बँकेत नोकरी देण्यात आल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. ही तक्रार करणाऱ्याला काही जण धमकावत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. यातील आरोपींनी नंदिग्राममधील आमदाराच्या कार्यालयात आश्रय घेतल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे आम्ही बंद कार्यालयाचे कुलूप तोडून छापा मारला. आम्हाला सगळ्या खोल्या तपासू दिल्या नाहीत. फक्त तीन खोल्यांची तपासणी आम्ही केली. आरोपी न सापडल्याने आम्ही तेथून निघून आलो. या सर्व कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरणही आम्ही केलं आहे.

दरम्यान, वीरभूममधील हिंसाचारावरुन सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेत 28 मार्चला आमनेसामने आले होते. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजप (BJP) आमदारांनी सभागृहात लावून धरली होती. यामुळे विधानसभेत गोंधळ उडाला होता. यावर तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदारही आक्रमक झाले होते. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये हाणामारी सुरू झाली होती. हा प्रकार रोखण्यासाठी अखेर मार्शल आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. यात तृणमूलचे आमदार असित मुजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सुवेंदू अधिकारींसह पाच आमदारांनी अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT