Saamana Editorial News :  Sarkarnama
देश

Saamana Editorial News : अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय?; सामनातून भाजपवर घणाघात!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार निशाणा साधला गेला आहे. सामनाच्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपच्या धोरणांवर टीका करीत परखड टीका करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत. व्यापारी बहुमत विकत घेतात, पण जनतेच्या सामोरे जात नाहीत. हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल, अशा शब्दांत सामनातून भाजपवर बोचरी टीका केली आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे, 'महाराष्ट्र हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. डॉ. आंबेडकर याच मातीतले, त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी येथे कायद्याचेच राज्य शेवटपर्यंत राहील. पोर्तुगीज, ईस्ट इंडियाचे व्यापारी आले-गेले तसे सध्याचे धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की , केंद्रीय मंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र चांगला कळतो . बहुधा म्हणूनच ते मुंबई व महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला धजावत नाहीत. व्यापारी बहुमत विकत घेतात, पण जनतेस सामोरे जात नाहीत . हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल. देशात तसेच वारे वाहत आहेत.'

'पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. फडणवीस यांनी इतके केले. मग मुख्यमंत्री मिंधे आणि अजित पवार तरी कसे मागे राहतील? त्यांचीही गाडी सुसाट सुटली. अमित शहा यांचा जन्म मुंबईतला, शहा यांनी मुंबईत व्यापार केला आहे, कारखाना चालवला आहे, त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो, असे प्रशस्तीपत्र फडणवीसांनी दिले,' असेही अग्रलेखात म्हंटले गेले आहे.

'मोदी-शहा यांच्या काळात महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग, कार्यालये त्यांनी हलवून गुजरातला नेली. मुंबईत जन्म घेतल्याचे असे पांग ते फेडत आहेत काय? क्रिकेट ही मुंबईची ओळख. ते क्रिकेटही त्यांनी पद्धतशीरपणे गुजरातेत पळवले. शाह यांना महाराष्ट्राचा पाया खतम करायचा आहे. मराठी राज्याला गुलाम करायचे आहे. म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेली शिवसेना तोडली व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न चालवला आहे,असेही सामनातून म्हंटलेले आहे.

"हे सर्व घडवून आणण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ओवाळून टाकलेल्या भ्रष्ट लोकांची ‘मोट’ बांधली व राज्याची सूत्रे त्यांच्या हाती दिली. सत्तेवर सर्व मिंधे, पण बादशाही गुजरातकडे असे जे चित्र दिसत आहे ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविणारे आहे," अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातून आसूड ओढण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT