Jagan Mohan Reddy Sharmila Reddy Sarkarnama
देश

Jagan Mohan Reddy : बहीण शर्मिला यांना सोबत घेऊन जगनमोहन चंद्राबाबूंना घेरणार?

Rajanand More

New Delhi : दिल्लीत अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटलेला असताना आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आंध्र प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू केले असून इंडिया आघाडीतील अनेक नेते त्यांना पाठिंबा देत आहे.

शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांच्यासह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही रेड्डी यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. त्यामुळे रेड्डी आता विरोधकांसोबत म्हणजे इंडिया आघाडीत जाणार, या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, दिल्लीत इंडियासोबत गेल्यास आंध्र प्रदेशात परतल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या बहीण शर्मिला रेड्डी यांच्याशी ते जुळवून घेणार का, यावरूनही आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पक्षाची सत्ता आल्यानंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप जगनमोहन यांनी केला आहे. राज्यात सतत हिंसक घटना घडत आहेत. या घटनांमध्ये 30 लोकांचा जीव गेला आहे. खोट्या केस दाखल केल्या जात आहेत, असे आरोप जगनमोहन यांनी केले आहेत.

जगनमोहन यांच्या या आरोपांना इंडिया आघाडीतील नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे जगनमोहन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत इंडियाविरोधात लढले आहेत. एनडीएमध्ये असलेल्या तेलगू देसमने त्यांचा दारूण पराभव केला आहे. या पराभवानंतर पहिल्यांदाच थेट आंदोलनासाठी आलेल्या जगनमोहन यांना भेटण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक नेते जात आहेत. त्यामुळे ते विरोधकांच्या गटात सामील होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जगनमोहन सध्या कोणत्याही आघाडीत नाहीत. त्यामुळे त्यांनाही दिल्लीत आपला प्रभाव टाकण्यासाठी विरोधकांची मदत लागणार आहे. त्यासाठी विरोधकांच्या बाजूने त्यांना उभे राहावे लागणार आहे. लोकसभेसह राज्यसभेतही त्यांना विरोधकांची साथ द्यावी लागेल. तसे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात ते आघाडीत आल्यास नवल वाटायला नको.

आंध्रात काय करणार?

दिल्लीत विरोधी गोटात सामील होण्याच्या हालचाली जगनमोहन यांनी सुरू केल्या असल्या तरी आंध्रात ते असा निर्णय घेणार का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. राज्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष शर्मिला या त्यांच्या भगिनी आहे. निवडणुकीत ते दोघेही विरोधात उभे ठाकले होते. त्याही सरकारला रस्त्यावर उतरून घेरत आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात दोघे बहीण-भाऊ आवाज उठवत आहेत. पण त्यांचा आवाज सध्यातरी स्वतंत्र आहे. पण दिल्लीतील घडामोडींमुळे ते एकत्र येऊन चंद्राबाबूंना घेरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT