Ajit_Pawar
Ajit_Pawar 
फीचर्स

मीच होणार पुण्याचा पालकमंत्री !

ज्ञानेश सावंत

पुणे  : पुणेकरांसाठी मुळशी धरणातून पाणी आणू, रिंगरोडसह वाहतूक कोंडी, हेल्मेट सक्तीतून मार्ग काढू, नव्या गावांचा विकास, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा कामांसाठी सकाळी सात वाजल्यापासूनच बैठका होतील, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपण पुण्याचे पालकमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. 
कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत, मीच पालकमंत्री होणार असल्याने अडचणी जाणून घेत आहे, असेही त्यांनी जाहीर केले.


विधानसभा निवडणुकीनंतर पवार यांनी शनिवारी पहिल्यांदाच पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे, जयदेव गायकवाड, सुनील टिंगरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आदी उपस्थित होते.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा कारभार, त्याचे परिणाम आणि वस्तुस्थिती याकडे पवार यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले. दरम्यान, गृहमंत्रिपदासह पुण्याचे पालकमंत्रिपद घेण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे केली. त्यावर शेवटी पालकमंत्री होणार आहे म्हणून हे सगळे विचारत असल्याचे पवार यांनी सांगितले.


पवार म्हणाले, "पुणेकर आणि शेतीला पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याची योजना आहे. त्यासाठी टाटा कंपनीशी पक्षाध्यक्ष शरद पवार बोलतील. त्यामुळे या योजनेत अडचणी येणार नाहीत. महापालिकेच्या शिक्षण विभागात नव्याने काही बदल करू. रस्त्यांच्या रुंदीकरणासह उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली जाईल. नगर रस्ता, सासवड रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडविली जाईल. ज्यामुळे पादचारी, वाहनचालकांना धोका राहणार नाही.''

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप देशमुख यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT