Ganeshrao Doodhgaonkar
Ganeshrao Doodhgaonkar 
फीचर्स

भुखंड प्रकरणी परभणीचे माजी खासदार गणेशराव दुधगावकर अडचणीत

सरकारनामा

परभणी :  ज्ञानोपासक महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी घेतलेला भुखंड खोट्या नोंदी करून भुखंड लाटणाऱ्या तलाठी दत्तात्रय कदम यास पोलिसांनी शुक्रवारी (ता.12) रात्री अटक केली. तलाठी कदम यास अटक झाल्यामुळे या प्रकरणातील आरोपी असलेले माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

येथील ज्ञानोपासक महाविद्यालय हे माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील 135 कर्मचाऱ्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून सर्वे नंबर 613 मध्ये स्वताच्या पैश्यातून 16 एकर 8 गुंठे जमीन घेतली होती. ही जमीन मुख्यप्रवर्तक नारायण माधवराव बुलंगे यांच्या नावे खरेदी केली होती. त्यानंतर माजी खासदार गणेशराव दुधगावकर व महसूल विभागातील तलाठी डी.एस.कदम यांनी महसुल दप्तरी बनावट व खोटे फेरफार नोंदवून ती जमीन माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या नावे करून दिली.

 या प्रकरणी ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. सोळूंके यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्यासह महसुल विभागातील दत्तात्रय श्रीरंग कदम, निवृत्त तलाठी रावसाहेब भागुजी पाटील, निवृत्त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्त नायब तहसिलदार वि.गो.गायकवाड, निवृत्त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्या विरुध्द ता. 16 डिसेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता.

 गुन्हा दाखल झाल्यानंतर तलाठी दत्तात्रय कदम याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतू न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन नाकारला होता. परत त्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दिला. परंतू गुरुवारी (ता.11) सुनावणी होऊन त्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने नाकारला.

त्यानंतर लगेचच नानलपेठ पोलिसांनी आरोपी दत्तात्रय कदम यास शुक्रवारी (ता.12) रात्री उशिरा अटक केली. त्याला शनिवारी (ता.13) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार (ता.15) पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात आरोपी असलेले माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्यासमोरील अडचणीत आता वाढ झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT