Jitendra Awhad Express Fellings on CAB and NRC Through Poem
Jitendra Awhad Express Fellings on CAB and NRC Through Poem 
फीचर्स

ही माती माझी ओळख सांगते : डाॅ. जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केल्या कवितेतून भावना

सरकारनामा ब्युरो

पुणे : भाजपच्या सरकारने संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आणि NRC वरुन सध्या देशभरात वातावरण पेटले आहे. विविध शहरांतल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची आंदोलने होत आहेत. ही आंदोलने दडपण्याचाही प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी कवितेद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न बाजूला ठेवून भाजप सरकार एनआरसी (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) सीएए (नागरिकत्व दुरुस्ती) लागू करून देशात दुही माजविण्याचे काम करत आहे, असा आरोप सरकारवर केला जात आहे. एका विशिष्ट समाजाला डोळ्यांसमोर ठेऊन सरकारने ही पावले उचलल्याचाही आरोप होत आहे. सरकार या कायद्याला विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. या साऱ्या परिस्थितीवर डाॅ. आव्हाड यांनी कविता केली आहे. त्यात ते म्हणतात..... 

ह्या मातीत आहे राख आमच्या बा च्या बा ची
कुठून आणू कागद दाखवायला माझ्या ओळखीची
घर नाही दार नाही वणवण फिरले
आभाळाला छत आणि जमिनीला आधार म्हणून जगले
तेंव्हा कुणी बी हुसकवलं तर जमीन मोप होती
कारण ती थोडीशी माझ्या बा ची पण होती

कांबळ्याचा नाऱ्या
मोहल्ल्यातला शेरू
बकऱ्या चारणारा बाबू मित्रांचा गोतावळा
वाचता लिहिता पण येत नव्हतं
पण नातं घट्ट होतं

आता मातीची ओळख चालणार नाही म्हणतात
कागदाचं चिटोरं नाही म्हणून तुमचं मातीशी नातं काय विचारतात

अरे तुमचा बाप जेव्हा शाळेत गेला
तेव्हा माझा बाप रानात गेला
तुमच्या कडचं दोन वेळचं जेवण
आणि आमची एका भाकर तुकड्यासाठी वणवण

आता चिटोरं कुठून आणायचं
पूर्वी हाकलत होता गावातून
आता काय हाकलणार देशातून??

आरं भाड्यानो कुठं होते तुमचे बापजादे गोऱ्यांशी लढताना
लाज वाटत नव्हती त्यांची चाकरी करताना??
भुके अनवाणी लढले आमचे बापजादे 
खाऊन गोळ्या सांडले ह्या मातीत रक्त
ह्या मातीसाठी केले हे फक्त

ज्याचं ज्याचं रक्त सांडलं ह्या मातीत
त्याचा हा देश आहे 
तुम्हाला वाटतो तुमच्या बा चा आहे 
पण आधी तॊ माझ्या बा चा आहे 
षंढची औलाद नाही जे घाबरून जगू
तेंव्हा बी गोळ्या झेलल्या आज बी झेलू
ह्या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT