sambhaji_patil_nilangekar 
फीचर्स

आपण जे पेरतो तेच उगवते  : संभाजी पाटील निलंगेकर

संदीप काळे


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची तयारी सुरु आहे. भाजपचा वेगळा चेहरा म्हणून ओळख असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांची संदीप काळे यांनी प्रश्नोत्तर स्वरूपात घेतलेली मुलाखत . 

तुम्हाला निवडणुकीच्या निकालाचे टेन्शन दिसत नाही, काय सांगाल?

मागील पाच वर्षांच्या काळात विकासाच्या मुद्द्याला घेऊन आम्ही तळातील माणसांपर्यँत पोहोचलो. मागील तीन वर्षांत लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जिंकल्या आहेत. नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जातो. एखाद्या परीक्षेचा निकाल सांगण्याची गरज नसते. तसाच लातूरचा विषय आहे. 


सध्या भाजपाचा राजयोग कसा आहे?

सर्व जागा निश्चितपणे बहुमताने येतील. याशिवाय मी विश्वासाने सांगू शकतो की, लातूरमधील सर्व जागा चांगल्या मताने निवडून येतील. 


अभिमन्यू पवार यांच्या जागेमध्ये काय पक्षीय गणित आहे?

जागेचा विषय हा पक्षश्रेष्ठींकडे असतो. स्थानिक पातळीवरील काम पक्षश्रेष्ठींकडे पोहचवले आहे. त्यामुळे जो काही निर्णय असेल तो पक्षश्रेष्ठींचा असेल. 


मंत्री झाल्यानंतर फिटनेसकडे दुर्लक्ष झालं आहे का?

फिटनेस व्यवस्थित चालू आहे.  आमचे आदर्श माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हम फिट तो इंडिया फिट" हा फिटनेसचा संदेश देशाला दिलेला आहे. त्यामुळे आम्ही देखील हा संदेश घेत आमच्यासोबत आणखी लोकांना हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. 


येत्या विधानसभा निवडणुकीत काय अवघड वाटतंय?

अवघड असं नाही, जनतेला निश्चित माहितेय की, ज्या-ज्या वेळेला या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जे संकट आलं, त्याकाळात सरकार लोकांसाठी धावून आले आहे. सरकार पूर्ण ताकदीने येथे लातूरमध्ये उभा ठाकला आहे. त्यामुळे जनता सरकारसोबत उभी राहील हे नक्की..!


सध्या शरद पवार सर्व माध्यमांच्या पहिल्या स्थानी आहेत, याचा भाजपच्या मतांवर काही परिणाम होणार का?

सामान्य माणसांना रोजच्या बातम्यांमध्ये मसाला, तडका हवा असतो. तसाच हा प्रकार सुरु आहे. त्यापलीकडे जाऊन याकडे लोकं पाहत नाहीत. 


निवडणुकीला घेऊन कुठले विषय प्रामुख्याने जनतेसमोर मांडत आहात?

पाण्याचे विषय, रस्त्यासंदर्भातील विषय असतील, मोठ्या प्रमाणात महिलांसाठी केलेले सहकार्य असेल, असे विविध विकासकामे आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. 


लोकांना भाजपाची विकासकामे आठवत नाहीत, भाजप नेमकी कुठे अपयशी ठरली?

लातूरला दोन वर्ष पाऊस झालेला नाहीये. कमी पावसामुळे आपण पाण्याची बचत करून पाण्याचा वापर करत आहोत, याचे श्रेय जलसंधारणाच्या कामाला जाते. त्यानंतर सलग दोन वर्षांचा आपण आढावा घेतला तर कमी पाऊस आहे. ज्यावेळी ७० टक्के पाऊस पडतो त्यावेळी जलसंधारणाची कामे उपयोगी येतात.

 
निलंगेकर म्हणजे मॅनेजमेंट गुरु, मंत्री झाल्यावर त्याचा कसा उपयोग झाला?

आता सरकार आणि कार्यकर्ता असे समीकरण आहे. सरकारच्या योजना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खाली पोहचणे महत्त्वाचे आहे. माझे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशाचे कारण म्हणजे  मी सरकारच्या योजना खाली तळापर्यंत पोहचवू शकलो. याशिवाय कार्यकर्त्यांचं सहकार्य मला उपयोगी पडले. 

विलासरावांची जादू आजही कायम आहे, या निवडणुकीत त्याचा फटका बसेल का? 

माननीय विलासराव देशमुख साहेबांनी यांच्याकडून जो विकास अपेक्षित होता, तो वारसा इथल्या आमदारांकडून, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून लोकांना  देण्यात आला आहे. हे करण्यामध्ये ते कमी पडले असतील, असं लोकांचं मत आहे. जनता एकंदरीत त्यांच्यापासून लांब गेली आहे. 


येत्या निवडणुकीत भाजपाची काय रणनीती असेल?

आम्ही आणि आमचे मित्रपक्ष एकत्रित जर आले तर निश्चितपणे २०० पेक्षा अधिक जागा आम्ही नक्की मिळवू असा विश्वास आहे. 


यात्रेचा काय फायदा झाला?

यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांसोबत लातूरमध्ये प्रवास केला होता. त्यावेळी लोकांचा दृष्टिकोन आणि आता असलेला लोकांचा दृष्टिकोन यामध्ये फार फरक आहे. आता लोकं सकारात्मक आहेत. आता यात्रेदरम्यान लोक बाहेर येऊन पाहतात. आपला माणूस म्हणून लोकं आशेने, आपुलकीने त्यांच्याकडे पाहत होते. हा खूप मोठा बदल आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा आकडा दोनशे पार होईलच..असं मला वाटते.

 
लातूरचा पाणीप्रश्न कायमचा असतो, त्यासाठी काही उपाय केलेत का?

आम्ही आज जलसंधारणाच्या कामातून जे काही प्रयत्न करता येतील ते केले आहेत. आमच्याकडे पाऊसच कमी असतो. भविष्यात वृक्षलागवडीकडे आम्ही अधिक जोर दिलेला आहे. कायम शाश्वत पाणी मिळावं यासाठी वाहून जाणारे पाणी खोऱ्यांमध्ये सोडलं. सरकार म्हणून येणाऱ्या काळात उजनीचे जे वाहून जाणारे पाणी आहे, ते उस्मानाबादच्या खोऱ्यात आले तर पाण्याची समस्या सुटेल असं मला वाटत. आम्ही त्या दिशेने काम करणार आहोत. 


एफपीओ प्रकल्पाचा अनुभव कसा होता? 

या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याने जेव्हा तंत्रज्ञानाचा वापर केला, त्यावेळी शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. आज राज्यात शेतकऱ्याची लँड होल्डिंग कमी झाली आहे, अशा परिस्थितीत अधिक उत्पन्न कसे घेता येईल? याकडे अधिक लक्ष दिले. एकत्रित येऊन शेती करणे, हे भविष्य आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून ही गोष्ट चांगली झाली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र नाही तर देशभरात राबवायला पाहिजे असं मला वाटतं. 


भाजपात नव्या लोकांची इनकमिंग सुरु असताना जुन्या लोकांवर अन्याय होतोय, असं वाटतं का?

भाजपात काही मोजक्या लोकांना घेण्यात आले आहे. ज्या जागेवर आपण विक  होतो, त्याजागेवर घेण्यात आले आहे.  एखाद्या कार्यकर्त्याला डावलून घेण्यात आलेले आहे, असा एकही अनुभव आपल्याला पाहायला मिळणार नाही. 


भाजपात लोकं स्वखुशीने येतात की, त्यांच्यावर दबाव आणला जातो? 

आपण जे पेरतो तेच उगवते . या गोष्टीच राजकारण करणे चुकीचं आहे. त्यांनी सर्व चौकशीला पुढे जायला पाहिजे. २०१३ ला याच सरकारने माझ्याविरोधात सीबीआयची चार्जशीट फाईल केली. त्यावेळी कायद्यावर आम्ही विश्वास ठेवला. यांनीही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, न्यायव्यवस्था खरं खोटं समोर आणेलच..!


आई आणि तुमच्यात काय गप्पा होतात राजकारणाच्या?

आम्ही कितीही कामात व्यस्त असलो तरी रात्रीच जेवण सोबतच करतो. त्यावेळी चर्चा करत असतो. त्या नेहमी ठामपणे पाठीशी आहेत. त्यामुळे आम्ही बिनधास्त बाहेर पडतो तो आईंचा आशीर्वाद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT