solapur-politics who will get ministerial berth
solapur-politics who will get ministerial berth  
फीचर्स

सोलापूरकरांना हवाय सर्वांना सोबत घेऊन जाणारा पालकमंत्री   

प्रमोद बोडके

सोलापूर : महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या पालकमंत्री वाटपाचा फॉर्म्युला यापूर्वीच जाहीर झाला आहे. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाला त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे सूत्र जवळपास निश्‍चित मानले जात आहे.

आमदार बबनदादा शिंदे, भारत भालके आणि यशवंत माने असे राष्ट्रवादीचे तीन आमदार सोलापूर जिल्ह्यात आहेत. कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि शिवसेनेचे शहाजी पाटील हे  आमदार आहेत. सोलापूरचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडे जाणार हे जवळपास निश्‍चित आहे. जिल्ह्यातील आमदारावर पालकमंत्रीपदाची धुरा येते की बाहेरच्या दिग्गज नेत्याला सोलापूरची जबाबदारी दिली जाते? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.


सलग सहाव्यांदा आमदार बबनदादा शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. निवडणुकीपूर्वी आमदार शिंदे यांनी शिवसेना की भाजप अशा दोन्ही ठिकाणी उमेदवारीसाठी केलेली चाचपणी त्यांच्या मंत्रिपदाच्या आड येण्याची भीतीही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. सलग सहाव्यांदा आमदार झालेल्या बबनदादा शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद हवे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. 


आमदार भारत भालके यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला आक्रमक नेतृत्व मिळाले आहे. भालके राष्ट्रवादीतून पहिल्यांदा विजयी झाल्याने त्यांना राज्यमंत्रीपदावर भागविता येऊ शकते. जिल्ह्यातील जुने चेहरे कोणीच नको म्हणून नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी मोहोळचे आमदार यशवंत माने यांनाही अचानक लॉटरी लागणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अस्तित्व आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून तर शिवसेनेचे अस्तित्व आमदार शहाजी पाटील यांच्या माध्यमातून शाबूत राहिले आहे. आमदारप्रणिती  शिंदे यांची हॅटट्रिक झाल्याने त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा कॉंग्रेसजन व्यक्त करत आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्रीपद महत्त्वाचे मानले जात असून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसला सोबत घेऊन जाणारा पालकमंत्री जिल्ह्याला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT