swaraj-Jaitley
swaraj-Jaitley 
फीचर्स

सुषमा स्वराज आणि अरुण जेटलींची उणीव जाणवेल

सरकारनामा

नवी दिल्ली ;  नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज आणि अरुण जेटली हे दोन चेहरे नाहीत. या दोन्ही अनुभवी आणि मातब्बर नेत्यांची उणीव जाणवणार आहे.

सुषमा स्वराज या भाजपच्या जुन्या आणि अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. एकेकाळी पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे अमोघ वक्तृत्व आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे सुषमा स्वराज यांच्या भोवती नेहमीच प्रसिद्धीचे वलय राहिले आहे. कधीकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या सुषमा स्वराज अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. जगभरात कुठेही भारतीय माणूस संकटात असेल तर त्याला संकटातून सोडविण्यासाठी सुषमा स्वराज अहोरात्र प्रयत्न करीत असत. ट्विटरवर जगात कुठूनही भारतीयाने त्यांच्याकडे मदतीची याचना केल्यावर सुषमाजींनी त्यांची अडचण सोडवली आहे.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सुमारे 90 देशांचे दौरे केले. या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी केलेल्या करारांची पडद्यामागची संपूर्ण तयारी सुषमा स्वराज यांनी केलेली असे. त्यांच्या परराष्ट्र मंत्री पदाच्या काळात भारताचे इस्लामिक देशांशी संबंध सुधारले. इस्लामिक देशांच्या संघटनेच्या व्यासपीठावर बोलण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या त्या भारताच्या पहिल्या परराष्ट्र मंत्री होत्या.

सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा दिला आणि परदेशातील भारतीयांना सातत्याने मदतीचा हात दिला. नरेंद्र मोदी सरकारची प्रतिमा जगात उंचावण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

मोदींचे संकटमोचक
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून अरुण जेटलींचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. नरेंद्र मोदी यांच्यातील नेतृत्वगुण हेरून त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणण्यात अरुण जेटली यांनी मोठी भूमिका बजावलेली आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांना बाजूला सारत नरेंद्र मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात 2014 मध्ये अरुण जेटली यांची फार महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

अत्यंत नावाजलेले वकील असलेल्या अरुण जेटलींनी पक्षांतर्गत आणि एकंदर राजकारणात नरेंद्र मोदी यांचे संकटमोचक म्हणून काम पाहिले. भाजपचा शहरी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाई. राफेल प्रकरणात कॉंग्रेसने आरोपांच्या तोफा डागल्यावर अरुण जेटली यांनी संसदेत आणि बाहेरही हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि कॉंग्रेसवर प्रखर प्रतिहल्ला चढवला होता.

केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नोटाबंदी, जीएसटी टॅक्‍सची अंमलबजावणी, बेनामी प्रॉपर्टी कायदा अशा अनेक महत्त्वाच्या योजनांची त्यांनी अंमलबजावणी केली. आधार कार्डाचा जास्तीत जास्त वापराबाबतही त्यांनी अनेक योजना आणल्या.

विधी व न्याय खात्याबाबतही त्यांचा शब्द नरेंद्र मोदी अंतिम मान असत. नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीत अरुण जेटलीच नंबर दोनचे मंत्री म्हणून देशाचाच कारभार पाहत असत. अरुण जेटली यांनी गंभीर अस्वास्थामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्याला सहभागी करू नये असे पत्र नरेंद्र मोदींना पाठवले होते.

 

सुषमा स्वराज यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. किडनीच्या विकाराने त्या आजारी आहेत. स्वतःच्या कर्तृत्वाने मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते.

राजनाथसिंह, नितीन गडकरी असे मातब्बर नेते मंत्रिमंडळात असले तरी भाजपला आणि मोदींना जेटली व स्वराज यांची उणीव भासेल हे नक्की !

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT