रोज कितीही धावपळ, कामाची दगदग असली तरीही सायकलिंगचा छंद आणि सायकलिंगमधून होणारा व्यायाम मी कधीही चुकवत नाही. रोज किमान ३० किलोमीटर सायकलिंग करून स्वतःला फिट ठेवत असल्याचे माढ्याचे (जि. सोलापूर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.
अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) परिसरातील सायकलप्रेमींनी एकत्र येऊन अकलूज सायकल रायडिंग ग्रुप तयार केला असून, या ग्रुपच्या माध्यमातून रोज सायकलिंग करत असल्याचेही खासदार मोहिते पाटील यांनी सांगितले.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांनी अकलूज परिसराचा सर्वांगीण विकास करत असताना, अकलूजनगरीत सुरू केलेला लावणी महोत्सव आणि कुस्ती स्पर्धा देशपातळीवर पोहोचली आहे. मोहिते पाटील परिवाराला कला व क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा आहे. हा वारसा जपत असतानाच शालेय जीवनापासून मी वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होत आलो आहे. हँडबॉल हा माझ्या आवडीचा खेळ असून, महाविद्यालयीन जीवनात मी राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत कामगिरी केली आहे. मी रोज सकाळी सहा वाजता उठतात रायगड ग्रुपमधील पंधरा ते सोळा सहकाऱ्यांसोबत ते अकलूज परिसरात जवळपास ३० किलोमीटरची सायकल रायडिंग करतो.
आमच्या ग्रुपचा एक नियम आहे, तो म्हणजे एखाद्या सदस्याने सायकल रायडिंगला दांडी मारली, तर त्याच्याकडून सर्व सदस्यांना पुरी-भाजी खाऊ घालण्याचा दंड आकारला जातो. साधारणतः दोन तासांची सायकलिंग झाल्यानंतर, मी घरी येतो. सकाळी भरपेट नाश्ता करून दुपारचा डबा घेऊनच घर सोडतो. दिवसभर जिथे वेळ मिळेल तिथे घरचे जेवण किंवा कार्यकर्त्यांच्या घरचे जेवण याच गोष्टीचा माझा कटाक्ष आहे.त्यानंतर सर्व कामे आटोपून रात्री अकरा वाजता झोपतो. सकाळी सहा वाजता उठून परत रोजचा दिनक्रम सुरू होतो.
दिल्ली-मुंबई किंवा बाहेरगावी असल्यानंतर कमी वेळेत होणारा व्यायाम करण्याला प्राधान्य देतो. मुंबईतील २६/११च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही अकलूज ते मुंबई सायकल रॅली काढली होती. ती आठवण आजही या भागातील सायकलप्रेमींच्या स्मरणात आहे.
शाळेत असल्यापासून खेळामध्ये सहभागी होत असल्यामुळे, सर्वच क्रीडाप्रकारांमध्ये मला रुची आहे. आता या खेळांच्या संघटनांमध्ये भूमिका बजावत आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिवपद, सोलापूर जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्षपद, धनुर्विद्या संघटनेचे जिल्हाध्यक्षपद व बास्केटबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्षपद अशी जबाबदारी आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख क्रीडा घडामोडींशी माझा संबंध येतो. सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने शासन दरबारी आवाज उठवीत असतो. नुकतेच आमच्या प्रयत्नातूनच अरण (ता. माढा) येथे धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र साकारले आहे.
अकलूजमधील शिवरत्न कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणूनही माझ्याकडे जबाबदारी आहे. या ठिकाणी मुला-मुलींना मॅटवरील कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या ५० मुले व पन्नास मुली प्रशिक्षण घेत घेत आहेत. अकलूजमध्ये २०२३मध्ये झालेली ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा देशभरात चर्चेत आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.