Chinchwad MLA Shankar Jagtap Fitness Sarkarnama
फिटनेस

MLA Shankar Jagtap: अष्टपैलू खेळाडू ते चिंचवडचे आमदार

Chinchwad MLA Shankar Jagtap Fitness: नेत्यांचा फिटनेस : ज्येष्ठ बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून आम्हाला व्यायाम आणि विविध खेळांचे बाळकडू मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवातीपासून पिंपरी-चिंचवड शहरात खेळाडू घडविण्याचे केले.

सरकारनामा ब्यूरो

नियमित व्यायामाला मैदानी खेळाची जोड मिळाली, तर शरीर सुदृढ व्हायला वेळ लागत नाही. त्याचबरोबर गडांवरील गिर्यारोहण, सायकलिंग यांसारख्या उपक्रमांतून तरुणांना योग्य मार्गावर नेण्यास मदत होते. सुदृढ शरीर आणि निर्मळ मन हाच कोणत्याही व्यक्तीचा खरा दागिना असतो, या शब्दांत चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी व्यायामाचे महत्त्व सांगितले.

निर्मळ मन आणि सुदृढ शरीर हेच खरा मौल्यवान दागिने असतात, हे आम्ही नेहमी ऐकत होतो. त्यातूनच लहानपणापासून व्यायामाबरोबरच खेळाचीही जोड दिली आणि शरीर जास्तीत जास्त निरोगी व उत्साही ठेवण्याचा प्रयत्न केला. लॉन टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, ट्रेकिंग, सायकलिंग, योगा, जिम्नॅस्टिक व कॅरम अशा वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये मला रुची आहे. त्यातूनच समाजाची अविरत सेवा करण्याची ऊर्जा मिळत असते.

माझे ज्येष्ठ बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून आम्हाला व्यायाम आणि विविध खेळांचे बाळकडू मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरुवातीपासून पिंपरी-चिंचवड शहरात खेळाडू घडविण्याचे केले. सन २००२ ते २०२४ पर्यंत सायकलिंग, ट्रेकिंग आणि प्रामुख्याने लॉन टेनिस व क्रिकेट या अशा खेळांमुळे मतदारसंघात अनेक खेळाडू तयार झाले आहेत. पूर्वी लॉन टेनिस हा खेळ पुण्यासारख्या शहरांमध्ये खेळला जात होता; परंतु हाच खेळ अंगीकारल्यापासून चिंचवड मतदारसंघामध्येही मोठ्या प्रमाणात टेनिस कोर्ट उभारले. त्यामध्ये सांगवी येथे तीन टेनिस कोर्ट, दोन बॅडमिंटन कोर्ट, काटेपुरम येथे दोन बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव, एक लॉन टेनिस कोर्ट तयार करून नवनवीन टेनिसपटू तयार झाले. त्यामध्ये गणेश मोरे या टेनिसपटूने टेनिसचे प्रशिक्षण घेऊन खेळाडू कोट्यातून हवाई दलामध्ये आपले स्थान निश्चित केले. तसेच; मुलीदेखील या खेळांमध्ये मागे राहिल्या नाहीत.

स्पर्धांचे आयोजन

शहरामध्ये लॉन टेनिसला वाढता प्रतिसाद मिळू लागल्यामुळे, त्यातून स्पर्धा आयोजित करण्याची प्रेरणाही मिळाली. त्यानंतर शहरात लॉन टेनिसच्या विविध अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये २००९ मध्ये भव्य महापौर चषक आयोजित करण्यात आला आणि पिंपरी-चिंचवड शहराला लॉन टेनिस या खेळाची तरुणांमध्ये आवड निर्माण झाली. सर्व भारतीयांचा जिव्हाळ्याचा असणारा क्रिकेट हा क्रीडा प्रकार २०१० पासून भव्य स्वरूपात आमदार चषक म्हणून दरवर्षी अविरतपणे सुरू केला. त्यामध्ये हजारो खेळाडू सहभागी होऊन मनमुराद खेळण्याचा आनंद लुटतात.

पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर सायकलवारी

सायकलिंगची मला खूप आवड असून, त्यातून शरीराचाही व्यायाय होतो. दररोज अविरतपणे सुमारे ५० ते ७० किलोमीटरची सायकल करत असतो. त्यातून माझे बंधू माऊली जगताप यांनी पिंपरी-चिंचवड ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला. अतुल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर अशी दरवर्षी सायकल वारी सुरू केली.

गिर्यारोहणातून ऊर्जा

सायकलिंग आणि अन्य खेळांप्रमाणेच गिर्यारोहणही हा माझ्या आवडीचा विषय आहे. महाराष्ट्राला, विशेषतः आपल्या पुण्याच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गड-किल्ल्यांचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पवित्र झालेल्या या किल्ल्यांच्या सहवासात तोच वारसा आपल्यालाही मिळत असतो. त्यामुळे मित्रमंडळी, तरुण वर्गाला सोबत घेऊन या गड-किल्ल्यांमध्ये फिरल्यानंतर ती ऊर्जा आपोआप आपल्याला मिळत असते. तसेच, महाराष्ट्रातील सर्वांत उंच कळसूबाई शिखर दोन वेळा सर केले आहे. माझे बंधू माऊली जगताप यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक पूर्ण केला आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. त्यातून सुदृढ शरीर आणि निरोगी मन हवे असेल तर नियमित व्यायाम, मैदानी खेळ, ट्रेकिंग-सायकलिंग यांना पर्याय नाही. त्यामुळेच, माझ्या आसपासच्या तरुणांना कायमच या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी करून घेण्याचा माझा प्रयत्न असतो.

(शब्दांकन : जयंत जाधव)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT