Rahul Kul  Sarkarnama
फिटनेस

Rahul Kul News : फिट अँड फाईंन आमदार राहुल कुल

Political News : पहाटे 5 वाजता उठून दररोज 1 ते दिड तास नित्यनियमाने व्यायाम करतो. वर्षभरातील 365 दिवस राहू, पुणे, नागपूर किंवा मुंबई येथे कुठेही असलो तरी व्यायामाचा खंड कधीच पडू देत नाही.

सरकारनामा ब्युरो

प्रकाश शेलार

Pune News : गेल्या 10 वर्षापासून मी दौंड ( जि. पुणे ) तालुक्याचा आमदार आहे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत दररोज जनमानसात असतो. हे करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे माझे जाणूनबुजून लक्ष असते.

पहाटे 5 वाजता उठून दररोज 1 ते दिड तास नित्यनियमाने व्यायाम करतो. वर्षभरातील 365 दिवस राहू, पुणे, नागपूर किंवा मुंबई येथे कुठेही असलो तरी व्यायामाचा खंड कधीच पडू देत नाही.

संतुलित आहार व नियमित जेवण याचा पाठपुरावा करत, मी 8 किलो वजन कमी केले आहे. याशिवाय क्रिकेट, कबड्डी ,बॅडमिंटन या खेळाची आवड मी जोपासली आहे. वयाच्या 46 तही स्वतःला फिट अँड फाईन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

आमचे कुटुंब मूळ राहू (तालुका दौंड जिल्हा पुणे) येथील आहे. आजोबा स्वर्गीय बाबुराव कुल हे दौंडचे पहिले सभापती होते. वडील स्वर्गीय सुभाष अण्णा कुल हे दौंडचे 13 वर्षे आमदार होते. जनसामान्यांची कामे करता करता त्यांचे स्वतःचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाले.

त्याची किंमत आमच्यासह कुटुंबासह संपूर्ण दौंड तालुक्याला चुकवावी लागली. त्यानंतर मातोश्री रंजना कुल (Ranjana Kul) दौंडच्या 7 वर्षे आमदार बनल्या. पत्नी कांचन कुल यांनी भाजपाच्या (BJP) वतीने लोकसभा निवडणूक लढवली आहे.

आमचे घर शेतामध्ये असल्याने लहानपणापासून शेतीची छोटी मोठी कामे करायचो. राहू येथील कैलास विद्या मंदिरामध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाले. या काळामध्ये कबड्डी व क्रिकेट खेळ शाळेच्या मैदानावर अनेकदा खेळलो. तेव्हापासून लागलेली क्रिकेटची आवड आजतागायत जोपासली आहे.

पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयाला असताना मित्रांसोबत व्यायाम करायचो. वडील स्वर्गीय सुभाष अण्णा कुल त्यांच्या आकस्मित निधनानंतर वयाच्या तेवीसीमध्ये भीमा पाटस कारखान्याच्या चेअरमन झालो. 36 व्या वर्षी 2014 मध्ये दौंडचा पहिल्यांदा मी आमदार झालो. तेव्हापासून आजतागायत तालुक्याचा आमदार आहे.

पहाटे नियमित व्यायाम

वैयक्तिक फिटनेस ठेवणे यावर माझा कटाक्ष असतो. रात्री कितीही उशिरा आलो तरी, पहाटे ५ वाजता उठतो. अडीच किलोमीटर ट्रेडमिलवर धावण्याचा सराव करतो. त्यानंतर घराच्या कडेने मातीचा रनिंग ट्रॅक तयार केला आहे. यावर ट्रॅकवर दररोज धावतो.

जिमच्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने व्यायाम करतो. त्यानंतर सूर्यनमस्कार करतो. प्राणायाम व योगासने करतो. सर्वात शेवटी जलनेति करतो. आंघोळ केल्यानंतर घरासमोरील जनसंपर्क कार्यालयात दौंड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यास सुरुवात करतो.

दिवसभरात फक्त एकदाच जेवण

सकाळी ब्लॅक कॉफी घेऊन दिवसाची सुरुवात करतो. दिवसभरात तीन वेळा साखर विरहित ब्लॅक कॉफी घेतो. दिवसभरात फक्त एकदाच जेवण करतो. सायंकाळी 4 वाजता जेवण असते. 45 मिनिटांच्या जेवणामध्ये सॅलड, ड्राय फ्रूट, मोड आलेले धान्य, कडधान्य यांचा समावेश असतो. याशिवाय भाकरी, भाजी यांचा समावेश असतो. जेवणासाठी दररोज घरचा डबा असतो. गोड, चमचमीत पदार्थ व तेलकट पदार्थ खाण्याचे टाळतो.

क्रिकेट खेळाची आवड

आजही वेळ मिळेल तेव्हा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. राहू (ता. दौंड) येथील बाबुराव कुल क्रीडानगरीवर सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावेळी वेळ काढून स्वतः सहभागी होतो. चांगली गोलंदाजी, फलंदाजी, करण्याचा प्रयत्न असतो.

सरकारनामा आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपूर येथे सहभागी झालो होतो. अनेक स्थानिक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना आवर्जून गोलंदाजी व फलंदाजी करतो. दौंड रोटरी क्लब आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत दरवर्षी सहभागी होतो. यावर्षी 3 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली आहे.

कोविड काळामध्ये महाराष्ट्रातील मी पहिला आमदार आहे, की ज्याने प्लाजमा दान केले होते. कोविड काळामध्ये कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये कोविड पॉझिटिव्ह निघालो, तरी दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो नाही. काही काळ स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. या काळामध्ये मोबाईलवरुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले.

आरोग्य या विषयावर काम

दौंड तालुक्यातील नव्हे तर पुणे जिल्ह्यातील जनतेसाठी आरोग्य या विषयावर काम करण्याचा प्रयत्न असतो. कोविड काळामध्ये चौफुला येथे सर्वात मोठे कोविड सेंटर उभारले. या सेंटरमध्ये पाच हजार रुग्णांना मोफत उपचार मिळाले.

यामध्ये पुणे, नगर, सातारा जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश होता. तसेच आजतागायत जिल्ह्यातील सहा हजार रुग्णांचे मुख्यमंत्री सहायता निधी व वेगवेगळ्या आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार केले आहेत.

माझे वडील स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल मला नेहमी म्हणायचे की, नियमित व्यायाम व इंग्रजी भाषा येणे महत्त्वाचे आहे. अण्णांच्या पश्चात या दोन्ही गोष्टींची जाणीव झाल्याने मी शरीरावर काम करत आहे. जेवताना जिभेवर नियंत्रण असते. वडापाव व बेकरीचे पदार्थ टाळतो. जेवण, व्यायाम व पुरेसी झोप या 3 गोष्टी सांभाळण्यावर भर असतो.

-राहुल कुल (आमदार)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT