MP Udayanraje Bhosale sarkarnama
उदयनराजे भोसले यांचा जन्म नाशिकमध्ये २४ फेब्रुवारी १९६६ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण देहरादूनला तर पुढील शिक्षण पाचगणीला झाले. सध्या ते आई श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे प्रतापसिंहराजे भोसले यांच्यासोबत सातार्यातील जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी राहतात. २० नोव्हेंबर २००३ रोजी दमयंतीराजे यांच्याशी लग्न झाले. त्यांना वीरप्रतापसिंहराजे आणि नयनताराराजे अशी दोन मुले आहेत.
उदयनराजेंची राजकिय कारकिर्द नगरसेवक पदापासून सुरू झाली. १९९१ मध्ये ते सातारा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९६ मध्ये सातारा लोकसभा निवडणूकीत अपयश आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १९९८ च्या सातारा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपमधून उदयनराजे निवडून आले. त्यांना महसूल राज्यमंत्री पद देण्यात आले. भाजपचे नेते कै. गोपीनाथ मुंडेंशी उदयनराजेंची खास जवळीक होती. जेम्स लेनप्रकरणी भाजपने योग्य भूमिका घेतली नाही, असा आरोप करत उदयनराजे भाजपमधून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर उदयनराजेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, पण कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळत नाही, हे कळल्यावर त्यांनी शरद पवारांशी संधान बांधलं.२००९, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आले.२०१९ मध्ये ते राष्ट्रवादीचा राजीनामा देत ते पुन्हा भारतीय जनता पक्षात गेले. परंतु लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना श्रीनिवास पाटील यांनी पराजित केले. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर घेऊन पुन्हा खासदार केले.
खासदार उदयनराजे भोसले यांचा आज (ता. २४) वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.