जिल्हा

जाब कसला मागता? राष्ट्रवादीने हिशोब द्यावा : गिरीश बापट 

मंगेश कोळपकर

पुणे : पुणे महापालिकेतील भाजपची सत्ता येऊन सहा महिने झाल्यापासून शहराचा विकास थांबल्याचा दावा करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपकडे आज जाब मागितला. याला पालकमंत्री गिरीश बापट यांनी आक्रमक उत्तर दिले. हाच पक्ष गेली 15-20 वर्षे पालिकेत सत्तेत होता. जाब कसला मागता? पंधरा वर्षांचा हिशोब द्या, असे आव्हान बापट यांनी केले. 

याबाबत बोलताना बापट म्हणाले, ""पालिकेचा अर्थसंकल्प दोन-तीन महिन्यांपूर्वीच सादर झाला. एक जुलै रोजी जीएसटी कर लागू झाला. त्यामुळे निविदा प्रक्रिया संथ झाली आहे. पण पुणेकरांना दिलेली आश्‍वासने भाजप पूर्ण करणार आहे. त्यासाठी वाट पाहावी लागेल.'' 

पुण्याच्या पाणीप्रश्‍नाबाबत बोलताना ते म्हणाले,""पाण्याचा वापर काटकसरीने करणे महत्त्वाचे आहे. तसेच शहराचा पाणी पुरवठा एका थेंबानेही कमी होऊ देणार नाही. शहराचा मंजूर पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. असेही त्यांनी सांगितले. 

पाणी वापराबाबत कालवा समितीच्या बैठकीत जलसंपदा विभागाने दिलेल्या व महापालिकेच्या माहितीमध्ये विसंगती आहे. या बाबत पत्रकार परिषदेत विचारणा केली असता बापट म्हणाले, ""मंजूर पाणीसाठ्यापेक्षा म्हणजे साडेअकरा टीएमसीपेक्षा जास्त पाणी उचलण्यास पुण्याला या पूर्वीच परवानगी दिलेली आहे. कारण शहरातील लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे वाद निर्माण करण्यापेक्षा असलेले पाणी काटेकोरपणे वापरणे गरजेचे आहे.'' टेमघर धरणाच्या दुरुस्तीमुळे सुमारे सव्वा दोन टीएमसी पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यातील सुमारे दीड-दोन टीएमसी पाणी मुंढवा जॅकवेलच्या माध्यमातून शेतीसाठी वापरता येईल. तसेच पाण्याचे आवर्तन देताना होणारी गळती, पाणी चोरी रोखली गेली तर, पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले. 

कालवा दुरुस्ती प्राधान्याने 

मुठा उजवा कालव्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रशांत जगताप हे महापौरपदी असताना कालवा दुरुस्तीसाठी महापालिका निधी देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. परंतु, शहरातून वाहणाऱ्या कालव्यातील पाणी वाया जात असेल तर, महापालिकेनेही मदत केली पाहिजे. वाद निर्माण करून पाणी वाया घालविणे योग्य नाही. कालवा दुरुस्तीसाठी महापालिकेने निधी द्यावा, असे सुचविले आहे. परंतु, महापालिकेने निधी दिला नाही तर, राज्य सरकारकडून दुरुस्ती केली जाईल. निधीचा प्रश्‍न फारसा गंभीर नाही, असेही त्यांनी म्हटले.

तसेच कालवा दुरुस्तीसाठी महापालिकेने आता निधी देण्याची तयारी दर्शविली आहे, असेही त्यांनी सांगितले. दत्तवाडी, जनता वसाहत परिसरातून कालव्यातून मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून गळती होत असल्याचेही बापट यांनी निदर्शनास आणले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT